झरेकाठी सोमनाथ डोळे शिवमहापुराण कथा व दिवाळीची धामधूम ओसरताच आता आश्वी परिसरात राजकीय तापमान चढू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींचा बिगुल वाजण्याचीच प्रतीक्षा असताना, राजकीय गोटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
आश्वी जिल्हा परिषद गटाला ओबीसी महिला आरक्षण,तर आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक गणांना महिला आरक्षण लागू झाल्याने पारंपरिक नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. गटातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत निराशा पसरली आहे. मात्र, “आश्वीचा कारभार आता लाडक्या बहीणींच्या हाती” जाणार असल्याने महिला नेतृत्वाचे वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे “महिला राज पुन्हा एकदा येणार” हे निश्चित झाले आहे.
दरम्यान,संगमनेर तालुका व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गट हा पद्मभूषण बाळासाहेब विखे पा.यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या गटावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे दशकांपासून निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
त्याच वेळी, मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गटात पाय रोवण्यासाठी वेळोवेळी जोरदार प्रयत्न केले. या चढाओढीतून विखे–थोरात गटांतील स्पर्धा आता पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच दोन्ही गटांमध्ये तीव्र वैर निर्माण झाले.
गणेश कारखाना,अहिल्यानगर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या सर्व लढतींमध्ये दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. विशेषतःमात्र,जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुका ठरणार आहेत.
दोन्ही गटांनी आपापल्या कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली असून,आश्वी जिल्हा परिषद गट हा आगामी निवडणुकांमध्ये शिर्डी आणि संगमनेर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
