संगमनेर किशोर वाघमारे महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला प्रकारातील सनई संबळ ताफासाठी प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्यातील खळी गावातील सखा-सुखा सनई वाजंत्री ताफा प्रसिद्ध आहे. या ताफ्यात प्रमुख सनई वादन करणारे सखाराम विश्राम वाघमारे व सुखदेव विश्राम वाघमारे हे दोघे सख्खे भाऊ संपूर्ण आयुष्य या कलेला जिवंत ठेवण्यासाठी आकाशवाणी केंद्र, आंतरराष्ट्रीय परिषदा,विविध लोकनाट्य तमाशा मंडळे, गाव यात्रा छबीना मिरवणूक, हजेरी, साखरपुडा, हळदी समारंभ, लग्न सोहळा इत्यादी कार्यक्रमात सहभागी होत होते.
ही प्रसिद्ध जोडी वृद्धापकाळाने काळाच्या पडद्या आड गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. हल्ली डिजे डॉलबीच्या ध्वनित अस्त होत आलेली ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सखा-सुखा राज्यस्तरीय वाजंत्री पुरस्कार वितरण परंपरा सुरु केली आहे.
सखाराम विश्राम वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात उत्कृष्ट सनई वादक पुरस्कार पाथरे येथील सर्जेराव दौलतराव कदम,खळीचे प्रसिद्ध सुर वादक रामा हिरा वाघमारे, पिंपरी लौकी अजमपूरचे उत्कृष्ट सनई वादक उत्तम लहानु कदम, रावजी देवजी कदम, मालुंजे येथील उत्कृष्ट संबळ वादक सुनिल खरात या पाच लोक कलावंतांना राज्यस्तरीय सखा - सुखा वाजंत्री पुरस्काराने मान्यवर निवृत्त परिवहन अधिकारी शिवाजी केरू कदम, निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वाघमारे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र चकोर, दाढ बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटी अध्यक्ष भाऊसाहेब पाळंदे, बौद्ध महासभेचे प्रचारक संजय कांबळे, बाल भिक्खु यांचे हस्ते रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सर्व आप्तेष्ट व खळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी संजय कांबळे यांनी लोककला,अंधश्रद्धा व बुद्धाची शिकवण या विषयावर प्रवचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ रमेश वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संदीप तांबे, शिवाजी वाघमारे,तान्हाजी कदम, राजेंद्र लहानु कदम तसेच पुण्यस्मरण व पुरस्कार समितीचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी अशोक वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.
