आझाद समाज पक्षाकडून निषेध; जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट यांचा सोनई बंदचे इशारा
नेवासा प्नतिनिधी तालुक्यातील सोनई येथे नुकतेच रात्रीच्या सुमारास येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर यांची शाब्दिक बाचाबाची होऊन काही गावगुंडांनी जात्यांध मानसिकतेतून जातीवाचक शिवीगाळ करत संजय यास लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.या निषेधार्थ घटनेची वैरागर कुटुंबीयांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
दाखल फिर्यादीनुसार, संजय बडाख हॉस्पिटल परिसरात मित्र मंगेश वाघमारे यांच्या सोबत उभा असताना संभाजी लांडे (रा. लांडेवाडी) व इतर आरोपी उपस्थित झाले आणि त्यांनी संजयवर लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. नितीन वैरागर जे भांडण थांबविण्यास गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. नंतर संजयला जबरदस्तीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून नेण्यात आले आणि काही वेळांनी त्याला मुळा कॉलेजच्या ग्राऊंडवर जखमी स्थितीत टाकून गेले.
जखमी संजय वैरागर यास प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई येथे दाखल करण्यात आले आणि पुढे त्यास अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; सध्या त्यावर उपचार सुरू आहेत.
फिर्यादीत नाव नोंदवलेल्या आरोपांमध्ये संभाजी लांडे, राज मोहीते गणेश चव्हाण, विशाल वणे,महेश दरंदले,शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे (पूर्ण नाव अज्ञात) आणि संदिप लांडे यांचा समावेश आहे. सर्व आरोपी रा. सोनई, येथील असल्याचे म्हटले आहे.
या क्लेशदायी घटनेवर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष व एसआरपी टायगर मोमेंट संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन संजय यांना भेट देऊन तीव्र निषेध नोंदविला. यावेळी नाथा आल्हाट यांनी सांगितले की
“गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी व ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे. अन्यथा आम्ही मातंग समाजाच्या वतीने सोनई बंद करून निषेध व्यक्त करु.जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत गप बसणार नाही.
स्थानिक ग्रामवस्ती व सर्व समाज बांधवांनी या घटने बद्दल तीव्र संताप जाहिर केला असून स्थानिक पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले पोलीसांनी तात्पुरती प्राथमिक चौकशी सुरु करून आरोपींचा शोध सुरू केल्याचे यावेळी स्पष्ट केले.या घटनेचे वृत्त समजताच जिल्हा संघटक योगेश वाघचौरे, संगमनेर तालुका अध्यक्ष अमोल शेळके यांनी कार्यकर्त्या समवेत निषेध व्यक्त केला.
