मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारत आणि महाराष्ट्राकडे विविध क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत नव्या ‘मेरी टाईम पॉवर’च्या रूपात उभा राहत आहे. महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू आहे,असे सांगून या प्रवासात गुंतवणूकदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया मेरीटाईम वीक मध्ये केले.
सागरी ताकदीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे.मुंबईपोर्ट आणि जेएनपीए देशाच्या कंटेनर वाहतुकीत मोठी भूमिका बजावत आहेत.यात मुंबईसह, महाराष्ट्रातील बंदरांची भूमिकाही सदैव महत्वाची राहिली आहे. यातूनच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राने नुकतीच महाराष्ट्र शिप बिल्डिंग पॉलिसी २०२५ जाहीर केली आहे. या धोरणांतर्गत जहाजबांधणीसाठी एक मजबूत इकोसिस्टम आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेरीटाईम व्हिजनमध्ये आणि अमृतकाल मेरीटाईम व्हिजनमध्ये, वाढवण पोर्ट एक मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये लॉजिस्टिक आणि ब्लॉकचेन या दोन क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची सामरिक शक्ती आणि मेरीटाईम ताकद कशा प्रकारे विस्तारित करू शकू, यावरही राज्य शासन कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
