आश्वी संजय गायकवाड सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथील कोल्हार-संगमनेर रस्त्यावर सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले.या घटनेमुळे देशात लोकशाही धोक्यात आली असून,सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.
आंदोलन प्रसंगी बोलताना रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी, "जर देशाचे सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित राहील?"असा सवाल उपस्थित केला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरही विरोध झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी प्रा.अनिल मुन्तोंडे यांनी, "हक्क आणि अधिकार चळवळीतून प्राप्त झाले आहेत,त्यामुळे आंबेडकरी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न करू नये," असे आवाहन केले.
या आंदोलनामुळे कोल्हार-संगमनेर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र,पोलिसांनी निवेदन स्विकारल्यानंतर हे आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले. आंदोलकांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनात आशिष शेळके, सौ रुपाली सोनवणे, प्रा.अनिल मुन्तोंडे,कैलास कासार,योगेश मुन्तोंडे, राजेंद्र मुन्तोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
