नैसर्गिक शेतीत उल्लेखनीय कार्याबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव
आश्वी संजय गायकवाड पंतप्रधान धनधान्य कृषि योजना आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावच्या कृषी सखी सौ.शोभना प्रकाश सोनवणे यांना नैसर्गिक शेती क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नैसर्गिक शेतीचा प्रसार, शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय पद्धतींचे मार्गदर्शन व शाश्वत शेती पद्धतींच्या अंमलबजावणीसाठी शोभना सोनवणे यांनी केलेल्या कार्याचे राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले.
याच कार्यक्रमात सावरगाव तळ येथील कृषी सखींच्या नैसर्गिक शेतीतील कार्याचाही.कृषीमंत्री नामदार भरणे यांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला. या गौरवामुळे संगमनेर तालुक्यातील सर्व कृषी सखींचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्याचा सन्मान देखील संगमनेर तालुक्यातील कृषी सखींना मिळाला.यावेळी तालुक्यातील सर्व कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.
या सन्मानाबद्दल सौ. शोभना सोनवणे यांचे आश्वी खुर्द परिसरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
