“साईसेवा म्हणजेच खरी साधना” पद्मश्री सोनू निगम
आश्वी संजय गायकवाड पूर्वी मी शिर्डीत दर्शनासाठी आलो की बाबांकडे काहीतरी मागायचो.पण आज बाबांनी इतकं दिलंय की आता काही मागण्यासारखं नाही. मात्र, ‘साई डिजिटल रक्षक’ उपक्रमात सहभागी होऊन ‘साई ब्लेसिंग बँड’चे प्रकाशन करण्याची संधी मिळाली हे माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण आहे.साई डिजिटल रक्षक होणं हीच प्रसादाची देणगी असल्याचे प्रतिपादन गायक व संगीतकार पद्मश्री सोनू निगम यांनी नुकतीच शिर्डी येथे केले.
शिर्डीत दोन दिवसीय ‘साई सोशल मीडिया समिट’ पार पडले.जगभरातील १५०० हून अधिक ‘साई डिजिटल रक्षक’ या कार्यक्रमात सहभागी झाले. साईबाबांच्या शिकवणीचा संदेश डिजिटल माध्यमांतून प्रभावीपणे पसरवण्याचा दृढ संकल्प या समिटमधून करण्यात आला. यावेळी प्रसिध्द गायक व संगीतकार पद्मश्री सोनू निगम यांच्या हस्ते ‘साई ब्लेसिंग बँड’चे प्रकाशन व वितरण करण्यात आले.कार्यक्रमात पद्मश्री सोनू निगम,साई कथाकार सुमित पांडे, नरेन नाशिककर, शाम सुरेश हर्ष पांडे, अपूर्व मानकर, पिपळकर गुरुजी,श्र्वेतांक नाईक, शुभराम बहेल, विनोदवीर दिपक निमा आदींनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
-साई संस्थानचा जागतिक प्रवास
श्री साई बाबा संस्थान २००४ च्या अधिनियमानुसार कार्यरत असून साईबाबांचा संदेश जगभर पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.“साईबाबांचा प्रचार-प्रसार आज ६१ देशांपर्यंत पोहोचला आहे.लाखो साईभक्त दररोज शिर्डीत दर्शनासाठी येतात.आगामी काळात डिजिटल माध्यमांतून जगभरातील साईभक्तांना जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,असे श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
-संस्थानकडून अल्पदरात जागतिक दर्जाच्या सुविधा
संस्थान सीईओ गोरक्ष गाडिलकर म्हणाले, “संस्थान भक्तांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे भाविकांची संख्या समजून घेऊन व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.लवकरच मल्टिस्टोरेज पार्किंग सुविधा तसेच कॅन्सर निदानासाठी जागतिक दर्जाचे हॉस्पिटल सुरू होणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की “संस्थान अल्प दरात उत्तम निवास सुविधा ‘भक्त निवास’मधून देते. नाश्ता, जेवण आणि प्रसादालयातील भोजन सेवा ही पूर्णपणे मोफत आहे. श्रद्धा, सेवा आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधत साईबाबांच्या कार्याचा विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” सध्या संस्थानकडून सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून १.२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते असून ती वाढवून १.९ मेगावॅट करण्याचे नियोजन आहे, असे गाडिलकर यांनी सांगितले.
-साई डिजिटल रक्षक उपक्रम माझ्यासाठी सन्मानजनक
“साई डिजिटल रक्षक उपक्रमात सहभागी होणं हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी देणगी आहे.तसेच साई डिजिटल रक्षक’ म्हणून निवड होणं हे माझ्यासाठी सन्मान आणि बाबांची कृपा आहे. बाबांच्या कृपेने डिजिटल सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली. -वैभव ताजणे, इंटिरिअर डिझायनर
