शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी असलेले सक्षम शिक्षक घडविणे गरजेचे – डॉ. सुरेश पठारे
सीएसआरडी मध्ये रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
नेवासा प्रतिनिधी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई पॅटर्न) या शाळेच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या वतीने एक दिवसीय विशेष शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणास रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, मुख्याध्यापक मॅथ्यू येवले,उपमुख्याध्यापक पिटर बारगळ, प्राथमिक शाळा प्रमुख मनिषा देवळालीकर, देविदास कुटे तसेच सीएसआरडीचे डॉ.विजय संसारे,डॉ. प्रदीप जारे,सॅम्युअल वाघमारे यांच्यासह रोझलॅन्ड स्कूलचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीएसआरडी संस्थेच्या एज्युव्हिजन २०४०: शाश्वत भारतासाठी शाळा - सक्षम शिक्षक या प्रकल्पांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पाचा उद्देश शिक्षकांमध्ये मूल्याधारित शिक्षणदृष्टी,आत्मपरीक्षण, आणि व्यावसायिक क्षमतावृद्धी विकसित करणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये सकारात्मक विचारसरणी,नवनवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब,आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. सुरेश पठारे यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की, शिक्षक असणे म्हणजे केवळ विषय शिकविणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीचा पाया घालणे आहे. एक शिक्षक म्हणून मी कोण आहे, मी शिकवितो ते शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कितपत हातभार लावते हे आत्मपरीक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की,आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थी-पालक-शाळा या त्रिकोणातील संबंध अधिक समन्वयपूर्वक ठेवणे आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे नसून,मूल्याधारित, नाविन्यपूर्ण आणि भावनिक संवेदनशीलता विकसित करणारे असावे.
या कार्यशाळेमध्ये शिक्षकांसाठी आचारसंहिता आणि शिक्षकांच्या नैतिक जबाबदाऱ्या या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तज्ञांनी शिक्षकांच्या दैनंदिन कार्यपद्धतीतील संवेदनशील बाबी,संवाद कौशल्य, विद्यार्थ्यांशी वागण्यातील सकारात्मक दृष्टिकोन,आणि शिक्षणात आत्मपरीक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणानंतर शिक्षकांसोबत प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले ज्यामध्ये शिक्षकांनी शिक्षणातील विविध आव्हाने, वर्गातील परिस्थिती हाताळण्याचे अनुभव,आणि विद्यार्थ्यांशी आदरयुक्त संवाद यावर आपली मते मांडली. सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.
शेवटी मुख्याध्यापक मॅथ्यू येवले यांनी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानत सांगितले की,सीएसआरडी संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामुळे आमच्या शिक्षकांमध्ये नव्या ऊर्जेचा आणि दृष्टिकोनाचा संचार झाला आहे.या कार्यशाळेतून मिळालेल्या विचारांचे रूपांतर शाळेतील अध्यापन प्रक्रियेत नक्कीच होईल.कार्यक्रमास सर्व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या प्रशिक्षणाने शिक्षकांच्या मनात आत्मचिंतन व प्रेरणादायी विचारांची नवी दारे खुली केली.
