माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृती वर्तमान काळातच परावर्तित होतात आहेत.त्यालाच मानवतावादी धर्मात आणि वैज्ञानिक भाषेत पुनर्जन्म म्हणतात,तशीच आम्हाला खात्री आहे की आयुष्यभर श्रमिक जिंदगी जगलेल्या हिराबाई बाजीराव शिंदे यांच्या स्मृती इथेच परावर्तित होऊन आम्हाला नेहमी दिशा आणि प्रेरणा देतील.
अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील आयुष्यभर कष्ट व संघर्षाचे प्रतिक राहिलेल्या हिराबाई बाजीराव शिंदे (वय ७७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्योत्तर १९४८ मध्ये कोतुळ येथील सोनुबाई व काशिनाथ गिते यांच्या कुटुंबात जन्मलेल्या हिराबाई यांचे लहानपणापासूनच मातीशी नाते जुळले.दोन भाऊ व सात बहिणी अशा मोठ्या कुटुंबातील संस्कार पुढे त्यांच्या संसाराचा पाया ठरले.
लहान वयातच सुगाव बुद्रुक येथील शिंदे घराण्यात थोरली सून म्हणून त्यांचे आगमन झाले. चार दीर-भावजया, लहान-मोठी मुले मिळून वीस जणांच्या एकत्र कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळल्या.
शेती कामाबरोबरच ३० ते ४० वर्षे विडी कामगार म्हणून काम करत कुटुंबाचा आर्थिक भारही त्यांनी सक्षमपणे उचलला. घरातील सर्व दिरांच्या विवाह सोहळ्या पासून मुलांच्या शिक्षणा पर्यंत प्रत्येक जबाबदारी त्यांनी प्रांजळतेने पार पाडली.
धार्मिक संस्कारांनी नटलेल्या या परिवारात पितृपक्ष, देवकार्य, यात्रा उत्सव,आमरस कार्यक्रम यांसह पाहुणचाराचा मोठा पसारा सदैव असे. नातेवाईकांच्या सुख-दुःखात तत्पर धाव घेणे हा त्यांचा जीवनधर्म होता.कौशल्याबाई, कोंडाबाई आत्यांच्या कुटुंबाशीही त्यांनी नातेसंबंध जिव्हाळ्याने जपले.
प्रवरा नदीच्या पाईपलाईनमुळे शेतीतील कामे वाढली,तरी परिश्रम आणि जिद्द यांची साथ कधी कमी पडली नाही.विडी कामगारांच्या मुलांसाठीच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. आज त्यांच्या आशीर्वादाने परिवारातील सर्वजण विविध पदांवर कार्यरत आहेत.
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर तब्बल १२ ते १४ वर्षे विविध आजारांशी संघर्ष करत त्यांनी कधी हिम्मत हरली नाही. शेवटपर्यंत घर-परिवाराचे प्रेम जपत राहिल्या.
त्यांच्या जाण्याने सुगावसह परिसराने कष्ट, माया व संघर्षाची सावली गमावली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शब्दांकन:
प्रा.सौ.उज्ज्वला किशोर शिंदे
रयत शिक्षण संस्था
