सामाजिक संस्थेकडून 'सावधान'तेचा संदेश
आश्वी प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरातील नागरिकांना बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे सध्या दहशतीखाली जगावे लागत आहे.ऊस तोडणीच्या हंगामामुळे आणि जंगलक्षेत्राच्या ऱ्हासामुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीकडे आगेकूच करत असून,या गंभीर धोक्याची जाणीव ठेवून आश्वी खुर्द येथील 'कै. कुंडलिक धोंडीबा पा.गायकवाड सेवाभावी संस्थे'ने तातडीने जनजागृती संदेश फलक लावून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रवरा नदी लगतच्या आश्वी खुर्द भागात बिबट्या आणि त्यांच्या बच्छड्यांच्या हालचालीत लक्षणीय वाढ झाली आहे.याच कारणांमुळे पुण्याच्या जुन्नर येथे बिबट्याच्या निबिर्जीकरणाचे केंद्र सुरू होत आहे उसाच्या शेतीत माणसांची उपस्थिती वाढली आणि खाजगीकरणाने जंगलातील शांती भंग केली असतानाच,बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे.
विशेषतःसंध्याकाळच्या वेळेत बिबट्या व त्याची बच्छडे वारंवार रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ह्या रस्त्यावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने लहान मुले,वृद्ध व्यक्ती आणि पादचारी यांच्यावर हल्ल्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संस्थेचा जनहिताचा पुढाकार ग्रामस्थांमध्ये पसरलेली भीती आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन, कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्था, आश्वी खुर्द यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पुढाकार घेतला असून तो वाखाणण्याजोगा आहे.
संस्थेने परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यालगत तत्काळ 'बिबट्या सावधान' असे जनजागृती संदेश फलक लावले आहेत. या प्रभावी उपक्रमामुळे नागरिक वेळीच सतर्क होऊन आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकतील असा विश्वास संस्था प्रमुखांनी व्यक्त केला.
हिंसक बिबट्याच्या वाढत्या धोक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाने देखील उपाययोजना सुरू केल्या आहेत.वनविभाग शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत आहे.तसेच,शाळेच्या वेळेत फेरबदल आणि व्यापक लोकजागृतीचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना टळेल.
संस्थेच्या या वेळेवर आणि अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि वाटसरूंकडून मनापासून कौतुक होत आहे. "हा उपक्रम समाज सुरक्षेसाठी प्रेरणादायी असून, इतरांनीही यापासून धडा घ्यावा," अशी सकारात्मक भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
