श्रीगोंदा आदेश उबाळे ग्रामीण भागातील वाहतुकीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज वापरली जाणारी वाहने पूर्वीपेक्षा आकारमानाने मोठी आणि जास्त वजन वाहून नेणारी आहेत. त्यामुळे सध्याचे १० टनी डांबरी रस्ते वाढत्या वहनक्षमतेला तोंड देऊ शकत नसल्याने हे रस्ते अल्पावधीतच खराब होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्यांची क्षमता वाढवून १० टनीपेक्षा जास्त क्षमतेचे टिकाऊ व उच्च दर्जाचे रस्ते बांधावेत,अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात चार ते पाच साखर कारखाने असून ऊसवाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच तालुक्यातील भौगोलिक स्थितीमुळे वाळू, माती, वीटभट्टी साहित्य व बांधकाम साहित्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या सततच्या जडवाहतुकीमुळे सध्याचे १० टनी रस्ते त्वरित खचतात,तडे जातात व खड्डे पडतात.यामुळे रस्त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत असून खर्च केलेल्या शासकीय निधीचा अपव्यय होत आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून ग्रामीण भागातील रस्त्यांचे बांधकाम रचना तयार करताना जास्त वाहतूक सहन करणारी आधुनिक रस्ता रचना समाविष्ट करावी,तसेच भविष्यातील वाहतुकीचा अंदाज लक्षातघेऊन उच्च क्षमतेचे व टिकाऊ सिमेंट रस्ते बांधावेत,असे निवेदन मुख्यमंत्रीांकडे सादर करण्यात आले आहे.
ग्रामीण विकास,सुरक्षित वाहतूक,अपघातांची संख्या कमी करणे आणि रस्त्यांचा दीर्घकाळ टिकाव यासाठी ही मागणी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
