झरेकाठी सोमनाथ डोळे संत कवी महिपती महाराज व संत मुकुंददास महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व अमृतवाहिनी प्रवरेच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र दाढ खुर्द येथे २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या ब्रम्हलीन सदगुरु माणिकगिरी महाराज,बिरोबा महाराज अखंड हरीनाम सप्ताह दाढ खुर्द व पंचक्रोशी गावांच्या सहयोगातून महंत गुरुवर्य दत्तगिरी महाराज श्री क्षेत्र वरवंडी,उंबरेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत होत आहे.
शनिवार दि.२९ रात्री रामायणाचार्य परशुराम महाराज अनर्थे, कोपरगाव,यांची किर्तन सेवा होती.हरीकिर्तन सेवेचे पाचवे पुष्प गुंफताना 'काळ सारावा चिंतने’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे चिंतन मांडले.या ओळीमधून संत सदैव वर्तमान काळातील मनुष्याच्या स्थितीचे चित्रण करतात.
मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे काळ – तो कधी थांबत नाही,प्रतीक्षा करत नाही.आयुष्याचे दिवस निघून जातात आणि ते परत येत नाहीत.म्हणून काळ वाया घालवून मन चिंतेत गुंतवणे हे मूर्खपणाचे कार्य आहे.चिंता वाढली की समाधान,आनंद,कार्यक्षमता नष्ट होते. वाया वेळ जाऊ देऊ नका, चिंता सोडा आणि हरिनाम घ्या; भजन-कीर्तन करा. नीती, भक्ती, सदाचार यावर लक्ष केंद्रित करा व जीवनात परम सुखाची प्राप्ती करा.
आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.सप्ताहाच्या पाचव्या दिवशी भाविकांनी एकच गर्दी केली.गर्दीचा उच्चांक झाला.पंचक्रोशी परिसरातून हजारो भाविक उपस्थित होते. किर्तनानंतर परिसरातील पंगत देणारी गावे व दाढ खुर्द गावाच्या वतीने आमटी-भाकरीचा भव्य महाप्रसाद आयोजित केला होता. महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह भव्य-दिव्य स्वरुपात व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे.
सोमवार दि. १ रोजी एकादशीची शाबूदाणा खिचडी पंगत व मंगळवार दि. २ रोजी महंत दत्तगिरिजी महाराज यांचे सकाळी काल्याचे कीर्तन असून त्यानंतर बुंदी व उसळ असा मोठा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. तरी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सप्ताह कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
