श्रीरामपूर प्रतिनिधी नुकतेच महाराष्ट्र शासनाने दिव्यांग, निराधारांचे विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक मानधन माहे जानेवारी- फेब्रुवारी २०२५ पासून डी.बी.टी. द्वारे आधार सीडिंग असलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आदेशित केले आहे. त्यामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यापासून अनेक दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा,परीतक्ता, अनाथ हे मानधनापासून वंचित आहे तर काहींचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह असून देखील त्या लाभार्थ्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होत नाही.त्रस्त दिव्यांगांचा प्रश्न तात्काळ निकाली अन्यथा दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आधार दिव्यांग संघटना, प्रहार संघटना आदी सर्व दिव्यांग संघटनच्या वतीने “ लक्षवेधी लोटांगण आंदोलन” करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात अशा वंचित लाभार्थ्यांची संख्या तालुकानिहाय पाहता मोठ्या प्रमाणात आहे.बहुतांश दिव्यांग व वयोवृद्ध हे शारीरिक अडचणीमुळे एकाच जागी असल्यामुळे ते आधार अपडेट व बँक सीडिंग करिता जाऊ शकत नसल्याने त्यांचे अनुदान बंद झालेले आहे.
त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून मानधना अभावी दैनंदिन वैद्यकीय खर्च उपजीविकेचा खर्च भागविणे जिकरीचे झाल्याने गेल्या आठ महिन्यांपासून आपले जीवन आर्थिक विवंचनेत जगत आहेत.शासनाच्या वतीने देण्यात येणारे मानधनच बहुतांशी निराधारांचा एकमेव आधार आहे.
मात्र स्थानिक महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर याबाबत पूर्णतः उदासीन असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. केवळ औपचारिकता म्हणून डीबीटी एजन्सीकडे चौकशी करण्यात येऊन असमाधानकारक उत्तरे दिली जात आहेत.आमच्या हातात काही नाही.असे निष्काळजीपणे सांगायलाही चुकत नाहीत. मानधन जमा होत नसल्याने हे निराधार हवालदिल झालेले आहे.
जो पर्यंत संबंधित प्रशासनाकडून डी.बी.टी. चे १०० % काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत लाभार्त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येऊ नये.तसेच माहे जाने-फेब्रुवारी २०२५ पासून बँक खात्यावर जमा होत नसलेल्या लाभार्थ्यांचे आज पर्यंतचे सर्व थकीत मानधन एक रकमी वितरीत कण्यात यावे.
माहे ऑक्टोबर २०२५ पासून काही दिव्यांगाना वाढीव मानधनाचा लाभ दिला नाही त्यांचे थकीत वाढीव मानधन तत्काळ वितरीत करावे तसेच दिव्यांगांच्या शारीरिक परिस्थितीचा विचार न करता,ज्यांचे डोळे नाही, हात नाही, हाताला बोटे नाही,बहुविकलांग, मतीमंद असल्याने त्यांचे आधार बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन व डी.बी.टी. होत नाही अशा लाभार्थ्यांचे मानधन शासनाने सुयोग्य पद्धतीने वितरीत करण्यात यावे.
अशी मागणी मुख्यमंत्री,सामाजिक न्याय मंत्री, विशेष सहाय्य मंत्री, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचेकडे पत्राद्वारे करण्यात आली असल्याचे अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर तथा आधार दिव्यांग संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी सांगितले.
तथापि सदरील मागण्याबाबत शासनाने ठोस पाऊले न उचल्यास जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आधार दिव्यांग संघटना, प्रहार संघटना आदी सर्व दिव्यांग संघटनच्या वतीने “ लक्षवेधी लोटांगण आंदोलन” करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
