अहिल्यानगर विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषद स्थापनेपासून सेवा,समरसता आणि हिंदू संघटन या त्रिसूत्रीच्या आधारे समाजात कार्यरत आहे. हिच परिषदची खरी उपलब्धी आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहमंत्री तथा अखिल भारतीय सह सत्संग प्रमुख महेंद्रदादा वेदक यांनी केले.
सावेडी रोड येथील नगरी व्हिलेज सभागृहात आयोजित अहिल्यानगर विभागातील प्रमुख पदाधिकारी वर्गात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री वेदक पुढे म्हणाले की “श्रीरामजन्मभूमी आंदोलनापूर्वी अनेक हिंदूंना स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेण्यात न्यूनगंड वाटत होता; परंतु आंदोलनाच्या यशानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
आज भारत जागतिक पातळीवर अग्रगण्य होऊ नये, यासाठी अनेक परकीय तसेच देशांतर्गत शक्ती प्रयत्नशील आहेत.जागतिक महाशक्तींना जगभर कठपुतळी सरकारे असावीत अशी इच्छा आहे, आणि भारताचीही श्रीलंका किंवा बांगलादेशासारखी दुर्दशा व्हावी, असे कुटिल डाव रचले जात आहेत.”
आपले अतुल्य विचार व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “अशांती निर्माण करून सांस्कृतिक भोगवाद वाढविण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.या आव्हानांचा सामना करताना हिंदूंनी संघटित होणे अत्यावश्यक आहे.श्रेष्ठ तत्त्वज्ञान आणि भ्रष्ट आचरण ही हिंदू समाजाची शोकांतिका आहे. सुसंस्कारांची कमतरता, घटता जननदर, मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण, तसेच स्त्रीला देवत्व बहाल करूनही कौटुंबिक पातळीवर दुय्यम स्थान देणे या बाबतीत आपण अंतर्मुख होऊन कृतिशील होणे गरजेचे आहे.”
“देव, देश आणि धर्म यांच्या पुनरुत्थानासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हिंदुस्थान पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचेल,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत समरसता प्रमुख निखील कुलकर्णी, प्रांत प्रचारप्रसार सहप्रमुख संजय गोडबोले, बजरंग दल सुरक्षा प्रमुख सुशांत गाडे, विभाग मंत्री सुनील खिस्ती, जिल्हा अध्यक्ष आशुतोष लांडगे, जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.नितीन वाटकर यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली, निखील कुलकर्णी यांनी समरसता यात्रेचा आराखडा मांडला, संजय गोडबोले यांनी प्रचारप्रसार योजना स्पष्ट केली, तर सुशांत गाडे यांनी बजरंग दलाच्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
