आश्वी संजय गायकवाड दरवर्षीप्रमाणे यंदाही वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची असा पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ५ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती कीर्तनकार ह.भ.प. संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री संत ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने ही दिंडी यात्रा आयोजित केली जाते. यावर्षी ह.भ.प. संजय महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली ५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीक्षेत्र भऊर येथून आळंदी देवाचीकडे प्रस्थान होणार आहे.
दिंडीचा पहिला मुक्काम पिंपळवाडी (ता. राहाता) येथे राहणार असून पुढीलप्रमाणे मार्ग व मुक्काम निश्चित करण्यात आले आहेत:
६ नोव्हेंबर: निमगाव जाळी
७ नोव्हेंबर: पानोडी (ता. संगमनेर)
८ नोव्हेंबर: बिरेवाडी (ता. संगमनेर)
९ नोव्हेंबर: नांदूर खंदरमाळ
१० नोव्हेंबर: आळेफाटा (ता. जुन्नर)
११ नोव्हेंबर: वारूळवाडी, नारायणगाव (ता. जुन्नर)
१२ नोव्हेंबर: पेठ (ता. आंबेगाव)
१३ नोव्हेंबर: वाकी बुद्रुक (ता. राजगुरुनगर)
१४ नोव्हेंबर: दिंडी आळंदी देवाची येथे पोहोचेल
१५ व १६ नोव्हेंबर रोजी दिंडीचा आळंदी देवाची येथील न्यू पेठकर धर्मशाळा, इंद्रायणी गार्डन येथे मुक्काम राहील.
१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत ह.भ.प. संजय महाराज जगताप यांचे किर्तन होणार असून, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर अॅड. प्रमोद मुरलीधर जगताप (भऊर) यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आयोजकांनी वारकऱ्यांना आवाहन केले आहे की, दिंडीसाठी वेळेत उपस्थित राहावे, बिछाना सोबत ठेवावा, तसेच मौल्यवान वस्तू न आणाव्यात. दिंडीत कोणत्याही जीवित वा वित्तहानीबाबत आयोजक जबाबदार राहणार नाहीत,असेही सूचित करण्यात आले आहे.
वारकरी भक्तांनी या पवित्र दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन ह.भ.प. संजय महाराज जगताप (भऊरकर) यांनी केले आहे.
