नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रंगणार असून,आता वार-प्रतिवाराच्या फैरी सुरू झाल्या आहे.त्यामुळे जिल्ह्यातील प्रचार या आठवड्यात शिगेला पोहोचणार आहे.
राज्यातील नगरपालिका,नगर पंचायती निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड,येवला,सिन्नर,ओझर, पिंपळगाव बसवंत,चांदवड,इगतपुरी, सटाणा,भगूर,त्र्यंबकेश्वर व नांदगाव या ११ नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. नुकतेच माघारी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये नगरसेवकपदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत.
आता या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली आहे.निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टीचे आल्यामुळे या दोन दिवसांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर उमेदवार करणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.
प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दादा भुसे, तसेच शिंदे सेनेच्या वतीने इतर काही मंत्री, तर उबाठा शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे.
पक्षाकडून सुषमा अंधारे, सुभाष देसाई, तसेच अन्य काही पक्षांचे नेते सभा घेणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार यांची सभा इगतपुरी किंवा सिन्नरमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असून,त्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही; मात्र पक्षाच्या वतीने इतर काही मंत्री सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची नावे मात्र अजून निश्चित झालेली नाहीत,असे पक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले.
