नाशिक दिनकर गायकवाड मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला अडवून सहा ते सात जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून ठार करण्याचा प्रयत्न करून दहशत माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी चेतन सुकदेव सानप (रा. शिवपुरी चौक,पंडितनगर) हा तरुण वहिनीच्या गोळ्या घेण्यासाठी पवननगर येथील मेडिकलमध्ये मोटारसायकलीने जात होता. विनायक चौकातून जात असताना अचानक पाच ते सहा मुलांनी त्याला अडवले व "तुला माहीत नाही का, आम्ही कोण आहोत ते, मै स्वप्नील भाई, हम इधर के भाई है," असे म्हणून जोरजोरात त्यांच्या हातातील हत्यारे फिरवीत व इशारे करीत आवाज करीत होते.
तेव्हा मला का अडविले, असे विचारले असता त्यातील स्वप्नील पवार नावाच्या मुलाने "तुला आज संपवून टाकतो," असे बोलून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यात मारणार होते; परंतु तो वार चुकवून फिर्यादी पुढे पळाला.
आरोपीसोबतचे सचिन गुंबाडे, ओम्, सचिन डबके व इतर दोन ते तीन साथीदारांनी फिर्यादीला उद्देशून "याला मारून टाका, हा लई मस्ती करतो," असे म्हणून धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे या टोळक्याने परिसरात दहशत माजविण्यासाठी तेथील नागरिकांच्या घरासमोरील झाडांच्या कुंड्या उचलून घरांवर फेकल्या.
त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या घरांचे दरवाजे व दुकानदारांनी शटर बंद केले. म्हणून या टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली, हातगाड्यांना लाथा मारल्या, खिडक्यांच्या काचा फोडून दहशत पसरवली. हा राडा पाहून तेथील नागरिक किशोर पाटील, शिवाजी सावंत, मारुती शेवाळे, किरण शिंदे, नितीन रूपवते, संतोष चव्हाण, उमेश कुमावत आदी नागरिक जमा झाले.
आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली, तर एकेकाला पाहून घेऊ, अशी धमकी देऊन निघून गेले.याच टोळक्याने सप्तशृंगी चौक, सूर्यनारायण चौक,अक्षय चौक, पवननगर, गणपती मंदिराच्या पाठीमागे गाड्यांची तोडफोड करून दुकानदारांना व नागरिकांना शिवीगाळ केली,
तसेच नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर दगड, कुंड्या व हातातील हत्याराने मारून नुकसान करून दहशत पसरवली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात स्वप्नील पवार, सागर गुंबाडे,ओम्,सचिन डबके व इतर दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
