नाशिक दिनकर गायकवाड मालेगाव शहरात एका व्यावसायिकाने गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले असून,याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.यामुळे पुन्हा एकदा मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील डोंगराळे परिसरामध्ये झालेल्या घटनेनंतर मोठचा प्रमाणावर उद्रेक झाला होता. मागील आठवड्यातच थेट न्यायालयावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली होती.या सर्व ताज्या असताना पुन्हा एकदा अत्याचाराची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की दीपक छाजेड (वय ६०) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. १३ वर्षीय पीडित मुलगी ही त्याच्याकडे घरकामाला असणाऱ्या महिलेची मुलगी आहे. ती गतिमंद आहे.दोन दिवसांपूर्वी आईबरोबर ती व्यावसायिकाच्या घरी गेली होती. घराच्या परिसरात ती खेळत असताना संशयिताने फूस लावून तिला दुचाकीवर बसवून वैद्य हॉस्पिटल परिसरातील निर्जन स्थळी नेले.येथेच त्याने पीडितेवर अत्याचार केल्याचा संशय आहे.
एका अल्पवयीन मुलीला वाहनावर बसवून हा व्यावसायिक घेऊन गेल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते.त्यामुळे त्यांना संशय आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली पीडितेच्या वडिलांनी यासंदर्भात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला तत्काळ अटक करण्यात आली आहे.दरम्यान, न्यायालयात उभे केले असता संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे सरकारी वकील संजय सोनवणे यांनी सांगितले.
