नाशिक दिनकर गायकवाड-निमाणी स्टॅण्डजवळ झालेल्या एका खून प्रकरणी तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ फरारी असलेला आरोपी रणजित आहेर (वय २४, रा. राजवाडा, निमाणी बस स्टॅण्डसमोर, पंचवटी, नाशिक) या संशयित आरोपीस गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून येवला तालुक्यात अंदरसूल येथे एका पोल्ट्रीफॉर्मजवळ पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले.
सविस्तर माहिती अशी, की गेल्या वर्षी दि. २ फेब्रुवारी २०२४ च्या सायंकाळी फिर्यादी प्रितेश विलास काजळे याचा चुलतभाऊ संदेश चंद्रकांत काजळे हा आरोपी स्वप्नील उन्हवणे, पवन भालेराव, नितीन ऊर्फ पप्पू चौघुले, करण डेंगळे यांच्या समवेत निमाणी बस स्टॅण्डसमोरील सूर्या हॉटेलजवळ गप्पा मारत उभे असताना वाहन खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारातील देवाणघेवाणीतून वाद निर्माण झाला.त्यामुळे आरोपी रणजित आहेर व इतरांनी संदेश काजळे याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या व चॉपर मारून त्यास गंभीर जखमी केले. त्यापाठोपाठ त्याला बळजबरीने एका वाहनात
बसवून त्र्यंबकेश्वरकडे घेऊन गेले.
वाटेत या आरोपींनी लोखंडी रॉड व चॉपरने मारहाण करून संदेश काजळे यास जिवे ठार मारले. त्यानंतर मोखाड्यातील जंगलात नेऊन संदेश काजळे याच्या अंगावरील मौल्यवान दागिने काढून घेतले आणि ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे परिसरात बरीच खळबळ माजली होती.
याप्रकरणी तेव्हापासून रणजित आहेर हा फरारी होता, तर बाकीचे आरोपी स्वप्नील उन्हवणे, पवन भालेराव, पप्पू चौघुले, करण डेंगळे यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त
संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला फरारी आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यानच्या काळात फरारी रणजित आहेर हा दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांमध्ये सतत फिरतीवर असून, पत्ता बदलून राहत आहे, असे समजले. त्यातच गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे व घनश्याम महाले यांना समजले की, आरोपी रणजित आहेर हा सध्या येवला तालुक्यात अंदरसूल परिसरात एका पोल्ट्रीफॉर्मवर ओळख लपवून काम करीत आहे. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने अंदरसूल येथे सापळा रचला. रणजित आहेर हा कामावर येत असतानाच त्याला पोलिसांची चाहूल लागली. मात्र पोलिसांनी त्याला पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेतले व पुढील तपासकामी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी,सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, घनश्याम महाले,कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे,सुनीता कवडे या पथकाचे अभिनंदन केले आहे.
