ठाणे विशाल सावंत- ठाणे महापालिकेच्या आयटी विभागाने गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या विविध विभागांच्या वापरासाठी खरेदी केलेले सुमारे ४० लॅपटॉप सध्या कुठे आहेत,कोणाच्या ताब्यात आहेत आणि कोणत्या कामासाठी वापरले जात आहेत, याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.अधिकारी वर्गात धांदल उडाली असून यामुळे आयटी विभागाच्या कार्यप्रणालीबाबत गंभीर प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष निकम यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याची माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून आले. महापालिकेच्या विविध विभागांना आणि विभागप्रमुखांना हे लॅपटॉप तोंडी आदेश किंवा विनंतीच्या आधारे देण्यात आले होते.
मात्र,त्यांच्या वितरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, हस्तांतरण नोंदी किंवा लेखी मंजुरीची प्रक्रिया पार पाडण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. परिणामी, सध्या हे लॅपटॉप कोणत्या विभागात आहेत किंवा ते अधिकृत कामासाठी वापरले जात आहेत की वैयक्तिक वापरासाठी,याबाबत कोणतीही माहिती नाही.
तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात खरेदी केलेले लॅपटॉप सध्या कुठे आहेत?, हे लॅपटॉप कोणत्या उद्देशाने विभागांना किंवा कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते?, लॅपटॉप हरवल्यास त्याची जबाबदारी कोणाची?, लॅपटॉप परत मिळवण्यासाठी विभागाने काय कारवाई केली?, सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेली साधने गायब झाल्याचे हे पहिलेच प्रकरण नसून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास हा मुद्दा मोठ्या गैरव्यवहाराचे स्वरूप धारण करू शकतो, अशी चर्चा ठाणे महापालिका वर्तुळात रंगली आहे. विरोधकांसाठी हा मुद्दा राजकारणाचा ठरू शकतो असेही बोलले जात आहे.
लॅपटॉपच्या देखरेखीची जबाबदारी कोणाची ?
या घटनेमुळे ठाणे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा
ढिसाळपणा पुन्हा एकदा उघड झाला. या लॅपटॉपच्या देखरेखीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे?, असा सवाल त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.
सहायक आयुक्तांना देण्यात आलेले लॅपटॉपही मिळाले नाहीत
ठाणे महापालिकेतील काही सहाय्यक आयुक्तांना लॅपटॉप देण्यात आले होते. परंतु, काही सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या,बदली झाल्यानंतर त्यांनी लॅपटॉप संबंधित विभागाकडे जमा करणे अपेक्षित होते, किंबहुना त्या सहायक आयुक्तांनी ते परत करणे गरजेचे होते.,परंतु तसे झाले नाही.आणि अधिकाऱ्यांनी हे चाळीस लॅपटॉप बळकावले असुन संताप व्यक्त होत आहे.
