शिव छत्रपतींचा एकेरी उल्लेख प्रकरण तापले;काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या प्रकरणाने श्रीरामपूर शहराच्या राजकीय वातावरणात जोरदार खळबळ उडाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजप, शिवप्रहार, शिवसेना इत्यादी संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र विरोध करत कारवाईची मागणी केली होती.मिळालेल्या माहितीनुसार,काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या प्रचारासाठी वार्ड क्रमांक २ मधील सभेत भाषण करताना सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे काही नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली होती. शिवप्रहारचे शहराध्यक्ष चंद्रशेखर आगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवित गुजर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती.

या वादाचा परिणाम म्हणून काल सकाळी झालेल्या एका घटनेत चंद्रशेखर आगे यांनी सचिन गुजर यांच्यावर हात उगारल्याचा प्रकार घडला.या मारहाण प्रकरणी आगे आणि इतरांवर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कारवाई केली होती.

मात्र महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई होत नसल्याची भावना शिवप्रेमी आणि अनेक संघटनांमध्ये व्यक्त होत होती.याच पार्श्वभूमीवर आज ऋषिकेश सरोदे या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गुजर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ५५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गुजर यांनी राजकीय हेतूने आणि विशिष्ट समाजसमूहाला खुश करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत इतर धर्मियांच्या मनात द्वेषभावना निर्माण होईल असे विधान केले,जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे आहे.

या घटनेनंतर शिवप्रेमी, हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून सचिन गुजर यांना तातडीने अटक करण्यात यावी,अशी मागणी होत आहे. सोशल मिडिया, स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून शहरातील वातावरण तापले आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रसंग श्रीरामपूरात नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना हा प्रकार घडल्याने राजकीय तापमान आणखी वाढले आहे. प्रचारसभांतील वक्तव्यांवरून होणारे आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हेगारी प्रकरण यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणावर खिळले आहे. आगामी कारवाईकडे लक्ष पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काय कारवाई होणार, आरोपींना कधी अटक होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!