नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील बरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर,कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मा.आमदार धनराज महाले,जिल्हा बँकेचे मा. संचालक गणपत पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, सदाशिव शेळके यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन सहाध्यमंत्री नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ऑनलाईन शुभेच्छा देत गावक-यांचे अभिनंदन केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बरखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र उफाडे यांच्या संकल्पना व सक्रिय प्रयत्नातून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली.
गावाच्या विकासात शिवस्वराज्याचा संदेश देत हे स्मारक उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.मान्यवरांचे स्वागत सरपंच केशब बाघले व उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनी केले, समारंभात आमदार दिलीप बनकर,अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार धनराज महाले व माणिक उफाडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले, ग्रामीण भागातून छत्रपतींच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत एकात्मता व सामाजिक सलोखा
जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. गावात उपस्थितांना फेटे, आकर्षक रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, वणीचे सरपंच विलास कड, माजी सरपंच जयश्री कडाळे, बापूराव पडोळ, नरेंद्र पेलमहाले, विष्णू संधान, रमेश बोरस्ते, चंद्रकांत राजे विश्वासराव देशमुख, मनोज ढिकले, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
