म्हैसगाव कमलेश विधाटे राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराळ भागातील दरडगाव थडी येथील एका विवाहित महिलेने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या चिंचाच्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील लक्ष्मीबाई जालिंदर खामकर (वय ४५,) या विवाहित महिलेने सोमवारी रात्री घराजवळ असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
तिला प्रथम म्हैसगांव या ठिकाणी वैद्यकीय उपचार करण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे त्यानंतर त्यांना ताहाराबाद येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले होते. गळफास घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
यावेळी त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना प्रथम खबर दिली. तद्नंतर पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीस पाटील व ग्रामस्थांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क करून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस शिपाई रामनाथ सानप यांनी सदरील ठिकाणी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
मयत विवाहित महिलेने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करीत आहे.
