दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा शेततळ्यात बुडून मृत्यू
आश्वी संजय गायकवाड राहाता तालुक्यातील गोगलगाव शिवारात काल, रविवार (दि. २ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गोरक्षनाथ डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या चौधरी वस्तीजवळच्या शेततळ्यात बुडून शुभम पोपट चौधरी (वय ९, इयत्ता ३ री) आणि त्याची मोठी बहीण दिव्या पोपट चौधरी (वय १०, इयत्ता ४ थी) या दोन निरागस चिमुकल्यांचा करुण अंत झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही काळजाला पीळ पाडणारी घटना घडली.
दिव्या आणि शुभम,घराच्या आसपास खेळणारी ती दोन आनंदी फुलं. दिव्याचे शाळेतील हसरे चेहरे आणि शुभमची खेळकर मस्ती चौधरी कुटुंबाचे सुख होते. मात्र,काळाने काल सायंकाळी घात केला. शेततळ्याच्या पाण्यात डुबून त्यांचा मृत्यू झाला आणि चौधरी वस्तीवरील हास्य कायमचे थांबले.आणि वार्ता ऐकणाऱ्याच्या काळजात धस्स झाले.
या दुर्घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच हाहाकार उडाला.घटनेनंतर शेततळ्याजवळ जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पोटच्या गोळ्यांना गमावलेल्या आई जयश्री पोपट चौधरी आणि वडील पोपट मंजाबापू चौधरी यांची अवस्था तर अतिशय दयनीय होती. “माझे शुभम, माझी दिव्या!" असा टाहो फोडणाऱ्या त्या आई-वडिलांचे अश्रू कोणत्याही प्रकारे थांबत नव्हते. त्यांच्या किंकाळ्या ऐकून उपस्थितांचे काळीज हेलावून जात होते.
आज सोमवारी जेव्हा दोघा चिमुकल्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी नेले जात होते, तेव्हा शोकाकूल वातावरणामुळे संपूर्ण गोगलगाव सुन्न झाले होते. घरापासून स्मशानापर्यत, चिमुकल्यांना निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. प्रत्येक जण या निष्पाप जीवांच्या अकाली जाण्याने स्तब्ध झाला होता. चौधरी कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाच्या या डोंगरामुळे उपस्थितांच्या डोळ्यात देखील आश्रु तरळल्याचे चित्र पहावयास मिळाले.
