नाशिक दिनकर गायकवाड बंगल्यामधील लिफ्टचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण न करता सेवानिवृत्त वृद्धाची सुमारे साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी राजू रमेश कर्णिक (वय ६८,रा.आमोद बंगला, काळेनगर,आनंदवल्ली) हे सेवानिवृत्त असून, त्यांच्या बंगल्यामधील लिफ्टचे काम द्वारका येथील निवृत्ती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मे. ब्रोबेल इलेव्हेटर्स ॲण्ड एक्स्लेटर्स इंडिया प्रा. लि. चे संचालक दिगंबर दराडे, नारायण दराडे यांना एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यासाठी ९ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.
याबाबत फिर्यादी यांनी लिफ्टच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला; मात्र दराडे यांनी फिर्यादी यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.त्याचप्रमाणे आरोपींनी ठरल्याप्रमाणे वेळेत काम पूर्ण न करता फिर्यादीचा विश्वास भंग करून त्यांची सुमारे साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार दि. २२ फेब्रुवारी ते २७ मे या कालावधीत घडला.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दिगंबर दराडे व नारायण दराडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
