श्रीरामपूर दिपक कदम- श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिहाणी यांनी सरला बेट येथील प्रसिद्ध तपोभूमीला भेट देत महंत श्री रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरत असून धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात या भेटीची चर्चा रंगली आहे.
या भेटीदरम्यान श्रीनिवास बिहाणी यांनी सरला बेट परिसरातील विविध विकासकामांची माहिती महंत रामगिरी महाराजांना दिली.श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला संकल्प आणि कार्ययोजना सांगताना त्यांनी शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता,वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व धार्मिक पर्यटनाच्या प्रगतीची रूपरेषा मांडली.
त्यावर महंत रामगिरी महाराजांनी समाधान व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिला.प्रसंगी महंत श्री रामगिरी महाराज म्हणाले,“शहराच्या प्रगतीसाठी सेवा भावाने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास साधत सौहार्द,शांतता आणि एकात्मतेने कार्य करणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो.श्रीनिवास बिहाणी यांना भविष्यातील कार्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत.”
यावेळी श्रीनिवास बिहाणी म्हणाले की,“महंतांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी ताकद आहे.श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आध्यात्मिक शक्ती आणि समाजाचा विश्वास हीच खरी प्रेरणा आहे.शहराचे सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी आम्ही आग्रही राहू.”
याप्रसंगी श्रीरामपूर शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे,दत्तात्रय ढालपे,
जितेंद्र छाजेड,शशीकांत रासकर, जीतेन्द्र पवार यांसह विविध सामाजिक संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.सरला बेट परिसरात झालेल्या या भेटीने शहरातील धार्मिक आणि राजकीय वातावरणात विशेष उत्सुकता निर्माण झाली असून नगराध्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सामाजिक बांधिलकी, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही ताकद घेऊन श्रीनिवास बिहाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले असून मतदारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
