नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरातील कचऱ्याचे एकूण ८५ पैकी ४५ ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आले असून, उर्वरित ४० ब्लॅक स्पॉट महिनाभरात तातडीने बंद करण्यात यावेत,असे आदेश घनकचरा विभागाचे संचालक अजित निकत यांनी दिले.
गोवा व राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या ७५ विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक नुकतीच निकत यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी निकत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले,की ओला व सुका कच-याचे वर्गीकरण होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता एका घंटागाडीमागे आता स्वतंत्र पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
या पर्वक्षकाने आठ दिवस त्या घंटागाडीच्या मागे फिरून त्याचा अहवाल घनकचरा विभागाला देणे बंधनकारक केले आहे. ज्यामुळे ओला व सुका कचरा गोळा करण्यात काय अडचणी येऊ शकतात, याची
माहिती घेणे सोपे होणार असल्याचे निकत यांनी सांगितले. याशिवाय कचरा वेचकांचाही सर्व्हे केला जाणार असून, यात जास्तीत जास्त लहान-लहान कच-याचे ब्लॅक स्पॉटही निवडण्यात येणार आहेत.
कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष के ल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा विभागाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना ५०० रुपये, तर सोसायटींसाठी ३०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशितही केले होते.
काही दिवसांपूर्वीच मनपाने पन्नास हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा पाठविल्या होत्या; पण त्याची कोणतीही दखल न घेतल्याने आता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
शहरात कारवाईची तीव्रता वाढविली जाणार असल्याने गृहसंकुलांनीदेखील कच-याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीत द्यावे,असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
