आश्वी संजय गायकवाड महिलांच्या मौलिक अधिकाराची हमी भारतीय संविधान देत असल्याने महिलांनी कंबर कसून संविधान रक्षणासाठी मैदानात उतरले पाहिजे असे प्रतिपादन विशाखा निळे यांनी मालुंजे येथे केले.त्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा व महिला ग्राम शाखेचे उद्घाटन तथा पवित्र श्रामणेर संघाला भोजनदान कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अंतर्गत संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे ग्राम शाखा व महिला ग्राम शाखेचा उद्घाटन सोहळा तथा पवित्र श्रामणेर संघाला भोजनदान कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यातील महिलांची प्रथम ग्राम शाखा उद्घाटन करण्यात आले.यावेळी आशा खरात यांची महिला ग्राम शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भदंत डॉ. सुमेध बोधी (राष्ट्रीय कोषाध्यक्ष, भिक्षू संघ, चैत्यभूमी, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखालील पवित्र श्रामणेर संघाला भोजनदान देण्यात आले.
मालुंजे ग्राम शाखेची कार्यकारिणी तालुका अशोक गायकवाड यांनी तर महिला तालुका अध्यक्ष शैला भालेराव यांच्या वतीने महिला कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.एकाच वेळी प्रथमच पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली अहिरे यांच्या अध्यक्षस्थानाखाली कार्यक्रम पार पडला.यावेळी वैशाली अहिरे यांनी धम्म ध्वजारोहण केले.यावेळी भिक्षूसंघासह उपस्थितांशी ध्वजाला मानवंदना दिली.
प्रास्ताविक सागर खरात यांनी केले,सूत्रसंचालन आशा खरात यांनी तर आभार प्रदर्शन पूनम खरात यांनी केले. जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पवार व वरीष्ठ केंद्रीय शिक्षक सुरेश पवार व शैलेजा साबळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित लहान मुलांनीही मोठ्या आवेशात आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे भिक्षू संघाची प्रचंड मोठी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी फुलांच्या वर्षावात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
