कोल्हापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील हुपरी येथे मुलानेच आपल्या आई-वडिलांची निघृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.नुकतेच पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर संशयिताने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत या गुन्ह्याची कबुली दिली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपी,दगड,काठीने निर्दयीपणे हल्ला करून दोघांच्याही हाताच्या नसा काचेने कापून अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना हुपरी शहरातील महावीरनगरमध्ये पहाटे घडली.
विजयमाला नारायण भोसले (वय ७०), नारायण गणपतराव भोसले (वय ७८) असे हत्या झालेल्या आई-वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४८) स्वतःहुन हुपरी पोलिसांत हजर झाला आहे.
नारायण भोसले आणि त्यांची पत्नी विजयमाला आणि हल्लेखोर मुलगा हे तिघे महावीर नगरमधील अल्फालाईन गल्ली येथे वास्तव्यास होते.त्यांना तीन अपत्ये असून मुलगा चंद्रकांत व संजय या दोघांचे सराफी दुकान आहे.व्यवसाय निमित्ताने ते दोघेही बाहेरगावीच वास्तव्यास असतात. हल्लेखोर सुनील याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे. पण त्याच्या सततच्या त्रासामुळे त्याची पत्नी मुलासह माहेरी बेळगाव येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे सुनील हा आई
वडिलांसमवेत राहत होता.
गेल्या काही महिन्यांपासून घराची वाटणी करून मिळावी,या कारणावरून आई-वडिलांशी त्याचे सतत भांडण सुरू होते. घराची वाटणी करणे काही कारणाने शक्य नसल्याने आई वडील त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे वैतागलेल्या सुनीलने आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास वडिल झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर सुरुवातीला काठीने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर दगडाने ठेचले व खिडकीची काच फोडून
त्यांच्या हाताची नस कापली. यावेळी नळाला पाणी आल्याने आई विजयमाला या बाहेर विद्युत मोटर सुरू करत होत्या. त्या घरात येताच सुनीलने त्यांच्यावरही हल्ला करून डोक्यात वर्मी घाव घातला व त्यानंतर काचेने त्यांच्याही हाताची नस कापली.
या घटनेनंतर सुनील हा निवांतपणे घराबाहेर येवून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या येणाऱ्या शेजा-यांना हसतमुखाने जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात हाय,हॅलो करीत होता.काही वेळानंतर तो स्वतःहुन हुपरी पोलिसांत गेला व घडल्या प्रकाराची माहिती त्याने दिली.पोलिसांनी घडल्या प्रकाराची खात्री करून त्याला ताब्यात घेतले आहे.
