ग्रामस्थांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द हनुमानवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना, शुक्रवारी मध्यरात्री मोठी घटना घडली. रात्री सुमारे एकच्या सुमारास नितीन दिनकर पाबळे यांच्या गोठ्यातील एक ते दीड वर्षांच्या गायीवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला.
बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीला गंभीर दुखापत झाली.कालवडीने आणि इतर जनावरांनी मोठ्याने ओरडायला सुरुवात केल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ आणि नितीन पाबळे धावत घटनास्थळी पोहोचले.त्यांनी मोठा आवाज करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवले.ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून कारवाडीचे प्राण वाचले आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बिबट्याच्या वावराची वाढती चिन्हे लक्षात घेता वन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे,रात्री एकटे फिरणे टाळण्याचे व घराजवळील परिसर प्रकाशमान ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, दाढ खुर्द व परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली वन विभागाला कळवाव्यात,असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.
