फड कुंटूबियांना शासनाची ४लाखाची मदत
झरेकाठी सोमनाथ डोळे बिबट्याच्या हल्ल्यातून श्रीराजला वाचविण्यासाठी त्याच्या आई आणि आजीने दाखवलेले धैर्य खूप मोठे आहे.मानवी वस्तीतील बिबट्यांचा संचार रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी उपाय योजना केल्या आहेत.आत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी यापुर्वी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून,आवश्यकता असेल तर अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील चि.श्रीराज फड या पाच वर्षाच्या मुलावर ११ सप्टेंबर रोजी बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.विशेष म्हणजे त्यांच्या आईने आणि आजीने प्रसंगावधान दाखवून बिबट्याच्या तावडीतून श्रीराजला वाचविण्यात यश मिळवले. जखमी श्रीराजवर प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या रूग्णालयात उपचार केल्यानंतर पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.शासन नियमाप्रमाणे वन विभागाच्या माध्यमातून श्रीराज आणि त्याच्या परिवाराला ४लाख ६६हजार १३४ रूपयांचा निधीचा धनादेश पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पा.यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. जिल्ह्याचे वन अधिकारी विठ्ठल सालविठ्ठल यांच्यासह अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी श्रीराजची आस्थेने चौकशी केली.झालेल्या घटनेबाबत त्यांनी त्याच्या पालकांकडून माहीती घेवून शेडगावसह पंचक्रोशीतील गावांमध्ये बिबट्यांकडून होत असलेल्या त्रासाच्या तक्रारी त्यांनी ग्रामस्थांकडून समजून घेतल्या.वन विभागाच्या माध्यमातून सध्या बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहेत.पिंजर्यांची संख्या वाढविल्याने बिबट्यांना जेरबंद करण्यात यश येत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी ,जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यामातून यापुर्वी ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप केमेरे, विविध रेस्क्यु उपकरणे, यामध्ये जॅकेट, शुज, टॉर्च गन्स, प्रोटेक्टीव्ह सिड उपलब्ध केले जाणार असून, तसेच २२ रेस्क्यु वाहने तातडीने खरेदी करण्यात येत आहेत.यापैकी काही यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
