-पदवीधर आमदारावर नाव न घेता केली टीका
-पदवीधरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष;पदवीधर आमदार सत्यजित तांबे संगमनेरातच तळ ठोकुन
संगमनेर प्रतिनिधी महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही आणलेल्या निधीवर विरोधक अधिकार गाजवून श्रेय घेत असेल तर हे आता संगमनेरकर जनता ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी आता आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे,अशी टीका आमदार अमोल खताळ यांनी पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता केली.तसेच आमदार सत्यजित तांबेना पदवीधर मतदारांनी निवडून दिले मात्र त्यांचे पदवीधरांच्या अडीअडचणी समस्या प्रश्न सोडविण्याकडे सपशेल दुर्लक्ष होत असुन ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातच अडकून पडले असल्याचे पदवीधर मतदारांकडून बोलले जातेय.
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांना आमच्यामुळेच प्रशासकीय मान्यता मिळाली असे समाज माध्यमातून सांगणाऱ्यांवर टीका करताना माध्यमांशी बोलताना
आमदार खताळ म्हणाले,मी आमदार होण्यापूर्वी या रस्त्यांना तत्कालीन पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली होती. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम सुरू झाले नव्हते,यात या रस्त्यांमध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचा रस जास्त होता. परंतु तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे हे रस्ते रद्द करण्यात आले होते. परंतु सरकार बदलल्यानंतर मी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोनच्या वतीने हे रस्ते मंजूर करण्यात यावेत यासाठी वेळोवेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना अनेकवेळा भेटलो,पत्रव्यवहार केला. नुसती पत्र देऊन आणि कुठून तरी सही शिक्के आणून निधी मिळत नसतो तर निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो,असा टोलाही आमदार खताळ यांनी पदवीधर आमदार यांना लगावला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना स्वतः १३ ऑक्टोबरला आणि पुन्हा ३ नोव्हेंबरला पत्र दिले. त्यानंतर मंत्रालयीन कक्ष अधिकारी यांनी नाशिक कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांना पत्र दिले आणि त्या पत्रात आमदार अमोल खताळ यांच्या पत्राचा उल्लेख असल्याचे पत्रच माध्यमांसमोर दाखवत खोटेपणा जागेवरच उघड केला.
साकूर पठार भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते नामंजूर झाले त्यामुळे आमच्या निषेधाचे फलक लावले होते. परंतु आम्ही टीका टिपण्यांकडे दुर्लक्ष करून विकासकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ नोव्हेंबर, २०२५ रोजी साकूर येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. हे उपसा जलसिंचन योजना सर्वे कार्यक्रमासाठी आले असता लोणीवरून मी त्यांच्याबरोबर होतो. नामंजूर रस्त्यांना पुन्हा प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून मी त्यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून चार रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळवण्यात यश मिळवले अन् उर्वरित राहिलेल्या कामांना सुद्धा लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. तुम्ही मंत्री व आमदार असताना रस्त्यांच्या कामाचा प्रश्न सुटला नाही. परंतु अचानक समाज माध्यमातून आमच्या प्रयत्नामुळे हे चार रस्ते मंजूर झाले असा खोटा डंका पिटवत संगमनेरकर जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र १४ कामांपैकी ४ कामांना २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि ती कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
- महायुती सरकार विकास उद्धारक;खोट्या नाट्या भुलथापांना संगमनेरची जनता बळी पडणार नाही.
महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहे, परंतु काहीजण आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे याचा मी निषेध करतो. नगरपालिकेच्या निवडणुकीत माझ्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी आरोप केले होते,परंतु तुमच्या खोट्यानाट्या आरोपांना संगमनेरकर जनता कधीच बळी पडणार नाही असे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
