संगमनेर नितीनचंद्र भालेराव संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण कितीही संघर्ष असला तरी संकटांवर मात करून आयुष्य आनंदात जगता आले पाहिजे.एकीकडे काही लोक सर्वथैव असूनही संसाराच्या छोट्या-छोट्या समस्यांमुळे आपल्या आयुष्याला कंटाळतात निराश होऊन आयुष्य संपवतात तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे अनेक संकटाचा सामना करत अडीअडचणीला फाट्यावर मारत आयुष्य आनंदाने जगतात.कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील सौ.अनिता आणि भाऊसाहेब यांचा जीवन प्रवास ठरतोय जनसामान्यांना प्रेरणादायी.
सौ.अनिता आणि भाऊसाहेब यांनी आयुष्य जगण्याची वेगळी व्याख्या तयार केली लोकांना प्रेरणा देतात. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भाऊसाहेब पारखे हा ४१ वर्षीय तरुण ५७ टक्के पायाने दिव्यांग असून त्यांची पत्नी सौ.अनिता ही शंभर टक्के अंध आहे.तरी देखील ही कष्टाळू जोडी अपंगत्वाचे कुठलेही भांडवल न करता जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावरती मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
भाऊसाहेब चांगला कूक असून त्याने शिर्डी येथील अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्ये मांसाहारी व शुद्ध शाकाहारीचा दर्जेदार आणि रुचकर स्वयंपाकी म्हणून काम केलेले आहे.त्याच्या हाताला चांगली चव असली तरी पायाने दिव्यांग असल्यामुळे त्याला दररोज दहा किलोमीटर वरून कामावरती येण्या जाण्याचा त्रास होत असल्याने त्याने ते काम सोडून गावात छोटेसे हॉटेल सुरू केले होते परंतु व्यावसायिक स्पर्धेमुळे व भांडवल नसल्याने ते बंद करावे लागले.
संघर्ष हा या जोडीच्या पाचवीलाच पुजलेला आहे असे वाटते.भाऊसाहेब लहान असतानाच त्याचे सावत्र वडीलाचे निधन झाले अनिता ही लहान असतानाच तिचेही वडीलांचे देखील निधन झालेले आहे अनिताची आई पोटाची खळगी भरण्यासाठी लहानग्या अनिताला घेऊन परभणी येथून नाशिकला आली होती.
सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी मध्यस्थी करत भाऊसाहेब व अनिताचा विवाह घडवून आणला. लग्नानंतर एक मुलगी झाली तिचे नाव सायली ठेवले,सायली आज बारा वर्षाची असून ती इयत्ता सहावीत शिकत आहे तिचेही लहानपणापासूनच पोट दुखत असल्याने तपासण्या केल्या असता तिला अल्सरचा आजार सांगितला असून तिच्यावर नाशिक येथे औषधोपचार सुरू आहे.
अनिता दुसऱ्यांदा गरोदर राहिली सात महिन्यातच अनिताची प्रसूती होऊन मुलगा झाला परंतु अपूर्ण वाढीमुळे तो काही क्षणात दगावला.भाऊसाहेब व अनिताच्या आनंदात क्षणात विरजण पडले आयुष्याच्या उतारवयात संभाळायला आपला आधार जन्माला आला म्हणून दोघांनीही स्वप्न बघितले परंतु ते स्वप्न क्षणात भंग झाले त्यानंतर अनिताचे वेळोवेळी पोट दुखायला लागल्याने तपासण्या केल्या असता पित्ताशयाचा आजार कळला.
त्यावेळी अनिताला दोन महिने हॉस्पिटलमध्ये दाखल करून पित्ताशयाची शस्त्रक्रिया केली अनिताला धोका असल्याने आता ह्या दोघाही उभयतांना डॉक्टरांनी मूल होऊ न देण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान अनिताला माहेर कडील एकमेव आधार असलेल्या आईचेही निधन झाले आता अनिताला माहेरकडील कोणीही जवळचे नातेवाईक नाही.
भाऊसाहेबची वयोवृद्ध साठ वर्षांची कर्णबधिर आईचेही आजारपण व सांभाळण्याची जबाबदारी भाऊसाहेब व अनिता वरतीच आहे.उत्पन्नाचे कुठलेही ठोस असे साधन नसतानाही फक्त शासनाच्या मिळणाऱ्या अपंगाच्या तुटपुंज्या मानधनावर व अपंगत्वावर मात करत मिळेल ते काम करून कुणापुढेही हात न पसरता स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगणारे भाऊसाहेब व अनिता आपला घर प्रपंच चालवत आहे व आपल्या दवाखान्याचा खर्च भागवत आहे.ह्या अपंग जोडीचा संघर्षमय प्रवास धडधाकट माणसानाही नक्कीच संकटांशी लढण्याची प्रेरणा देणारा आहे.
अनिता आणि भाऊसाहेब सर्व संकटांवर मात करतील;दानशूर लोकांनी मदत करावी
अरुण खरात यांनी जेव्हा भाऊसाहेब अनिताचे लग्न जमवले तेव्हा त्यांच्याशी चर्चा केली असता ते येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करतील असा विश्वास त्याच वेळेस वाटला होता.आज ही जोडी प्रत्येक परिस्थितीशी झगडते याचा अभिमान वाटतो तरीही भाऊसाहेब पायाने अपंग असल्याने त्याला शारीरिक श्रमाचे काम करताना खूप त्रास होतो.अनितालाही डोळ्यांनी दिसत नसताना देखील घरातील प्रत्येकाच्या आजारपणामुळे दवाखान्याला लागणाऱ्या खर्चासाठी दोघांनाही काम करावेच लागते.
माझी प्रत्येक व्यक्तीला नम्र विनंती आहे की त्यांच्या व्यंगत्वावर टीका करून त्यांना अपमानित न करता त्यांना मानसन्मानाची वागणूक द्यावी व स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदत करावी हीच अपेक्षा.
-अरुण खरात
-सामाजिक कार्यकर्ते-कोपरगाव
