गावात चोख दारुबंदी साठी उपक्रम
निघोज प्नतिनिधी पारनेर तालुक्यातील निघोज येथे राज्य शासन व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दारूबंदी कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतर येथील दारूबंदी समितीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.येथील दारूबंदी समितीने प्रशासनाला गावात कायमची व दारूबंदी करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच येथे चोख दारूबंदी व्हावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती.
निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने कायमची बंद झाली असली तरी इतर अवैध मार्गाने गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते.या दारू विक्रीला आळा घालण्याकरिता येथील महिला व कार्यकर्ते यांनी निघोज गावात नुकतीच प्रचार फेरी काढली होती.
या प्रचार फेरीत गावात एक गाढव आणले होते.याच गाढवाच्या पाठीवर आणि कपाळावर दारूबंदीचा संदेश देणारी सजावट करून यावेळी दारूबंदीचे आवाहन करण्यात आले. प्रचार फेरी वेळी वाद्य कामाचे गजरात व घोषणा देवून यावेळी दारू बंदीचे आवाहन करण्यात आले.
गावात कुणी दारू विक्री करताना किंवा सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास प्रथम त्याला पकडून थेट गाढवावरून धिंड काढण्यात येईल व नंतर पोलिसांचे ताब्यात देण्यात येईल असा इशारा देखील येथील महिला व कार्यकर्त्यांनी दारू विक्रेत्यांसह पिणाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे अवैध दारू विक्रेते व दारू पिणारे यांच्यात खळबळ उडाली आहे.
आता यापुढे या दारूबंदी चळवळीच्या उपक्रमाचे पुढे काय परिणाम होतात हे पाहण्याची उत्सुकता आता परीसरातील लोकांना लागली आहे.याप्रसंगी दारूबंदी समितीच्या अध्यक्षा कांता लंके,मनीषा राऊत,विमल गोरे,शालन कवाद, भानुदास साळवे, शिवाजी भुकन,तुकाराम तनपुरे,सोमनाथ वरखडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.
