गायकवाड परिवाराच्या लग्न वाढदिवसाचे निमित्त
आश्वी संजय गायकवाड“मातृभूमी आणि मातृसंस्था कधीही विसरू नयेत,” या विचारांची प्रचिती देणारा प्रेरणादायी उपक्रम संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच पार पडला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता भुसाळ गायकवाड व त्यांचे पती श्रीरंग गायकवाड यांनी आपला मुलगा पियुष गायकवाड यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले.
कृतज्ञ भावनेने नुकतेच विद्यार्थ्यांना रुचकर स्नेहभोजन देण्यात आले.विद्यार्थ्यांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, मुख्याध्यापिका सौ.सविता भुसाळ व त्यांचे पती श्रीरंग गायकवाड हे दोघेही याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
ज्या शाळेने त्यांना घडवले,त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला एक टेबल भेट स्वरूपात प्रदान केले.गायकवाड परिवाराच्या या सस्नेह उपक्रमातून शिक्षण संस्थेप्रती असलेली ऋणफेडीची भावना,सामाजिक भान,ऋण व संस्कारशील विचारसरणी ठळकपणे दिसून आली.
प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वांनी भुसाळ व गायकवाड दाम्पत्याचे ऋण व्यक्त केले हा उपक्रम शाळेतील इतर माजी विद्यार्थी तसेच समाजासाठीही निश्चितच उत्सफुर्त प्रेरणादायी ठरणारा आहे.
