मानमोडे बाबा मंदिराजवळ बिबट्याचा हल्ला;प्रतापपुरात भितीचे वातावरण

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड जंगलचा अनभिषिक्त सम्राट गावात आला की,गावकऱ्यांची झोप उडते" अनेकांची त्रेधातिरपीट होते अशीच परिस्थिती सध्या संगमनेर तालुक्यातील प्रतापपुर परिसरात निर्माण झाली आहे.येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बाळासाहेब आंधळे यांचे चुलत बंधु बबन तुकाराम आंधळे (वय ५० वर्षे) यांच्यावर मंगळवार (दि. २ डिसेंबर) सकाळी १०.३० वाजता मानमोडे बाबा मंदिराजवळ बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
               छाया रेखांकन-प्रकाश कदम 
या घटनेत बबन आंधळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार निमगाव जाळी येथे करण्यात आले.त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बाळासाहेब आंधळे यांनी दिली.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,या परिसरात बिबट्याचे वास्तव्य काही दिवसांपासून असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही दुध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी गेलेल्या एका युवकावर बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र,युवक दुचाकीवर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सावध राहणे हेच शहाणपण, अशा दिलासादायक प्रतिक्रिया आता गावकऱ्यांमध्ये उमटत आहे.

या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.नागरिकांना रात्री किंवा पहाटे एकटे बाहेर जाणे टाळावे, तसेच पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले होते की,बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये विशेष पथकांमार्फत जनजागृती केली जात आहे.ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पगमार्क,विष्ठा आणि छायाचित्रांचा दररोज आढावा घेतला जातो.बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमांड कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे. सध्या दोन प्रशिक्षित बचाव पथक कार्यरत असून राहुरी वनपरिक्षेत्रातील बारागाव नांदूर येथे वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.तसेच बिबट्या बचाव केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

याशिवाय प्राथमिक प्रतिसाद दल, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलार्म प्रणाली,ड्रोन टेहळणी, आरएफआयडी मायक्रोचिप आणि ॲनिमल रिपेलंट यांसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र,या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.कारण एकीकडे बिबट्याचा वावर ग्रामीण भागात वाढत असून वनखाते केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का,अशी चर्चा सुरू आहे. कागदी वाघांची अनागोंदी आणि जंगलातले बिबटे,दोन्ही धोकादायकच!अशी टोमणे गावकऱ्यांकडून ऐकू येत आहेत.

सौ.शालिनी विखे पा.यांच्याकडून पिडितांना दिलासा 
-घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा.यांना समजताच त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी तसेच परिसरात गस्त वाढवण्यासाठी सूचना दिल्या.त्यानी स्वतः डॉक्टरांच्या पथकाशी दुरध्वनीवरून संवाद साधत असून बबन तुकाराम आंधळे यांच्याशीही फोनवर बोलून धीर दिल्याची माहिती डॉ.बाळासाहेब आंधळे यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!