परिसर आणि निसर्ग प्रेमींकडून हळहळ
झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील नांदुर्खी शिवारातील श्री शिवाजी राजे चौधरी यांच्या वस्तीजवळ, विमानतळ रस्त्यावर नुकतीच साडे नऊच्या सुमारास घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी ठरली. महिंद्रा बोलेरो या वाहनाने एका बिबट्याला दिलेल्या जोरदार धडकेत बलाढ्य वनराज क्षणात रस्त्याच्या कडेला कोसळला.धडक इतकी तीव्र होती की बिबट्या तात्काळ बेशुद्ध झाला आणि काही क्षणांतच त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहू लागले आणि निसर्ग प्रेमीच्या काळजात धस्स झाले.
धडक झाल्याची वार्ता कळताच शिवाजी राजे चौधरी यांच्या वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली. काही मिनिटांतच शेकडो नागरिक घटनास्थळी धावून आले आणि काही वेळात ही संख्या हजारांवर गेली.
रक्तबंबाळ, विव्हळलेल्या बिबट्याला पाहून नागरिकांच्या डोळ्यांत दाटून आलेले अश्रू आणि मनातील वेदना स्पष्ट दिसत होत्या. शांत रात्रीचा अंधार अचानक जखमी प्राण्याच्या वेदनांनी आणि लोकांच्या अस्वस्थतेने ढवळून निघाला.
घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे वाहतूक पूर्णतः खोळंबली. ट्रॅफिक पोलिसांना तातडीने पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वनविभागालाही तातडीने सूचित करण्यात आले असून बिबट्याला प्राथमिक मदत देऊन त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
विशेष म्हणजे, शिवाजी राजे चौधरी यांची वस्ती हा परिसर गेल्या काही वर्षांपासून “बिबट्यांचा कॉरिडॉर” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या ठिकाणी बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून अशा प्रकारची ही तिसरी भीषण धडक आहे. रस्त्यांच्या वाढत्या वाहतुकीमुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांच्या हालचाली अधिक असुरक्षित होत चालल्या आहेत हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
जखमी बिबट्याचा रक्ताने माखलेला देह, हलूही न शकणारी अवस्था आणि मंदावलेला श्वास पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रानावनात निर्भयतेने फिरणारा हा वनसम्राट आज माणसांच्या जगातल्या वेगवान जीवनपद्धतीचा बळी ठरल्याचे समजताच नागरिक अस्वस्थ झाले.
आजची घटना हे एक गंभीर स्मरण आहे.बिबट्यासारखे सुंदर, सजग,निसर्गाचे प्रहरी असलेले वन्यप्राणी आपल्याच दुर्लक्षामुळे जखमी होताना पाहणे ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. विमानतळ रस्त्यावरील ही दुर्घटना फक्त अपघात नाही तर निसर्ग आणि मानव यांच्या संघर्षाचे एक हृदयद्रावक चित्र आहे.जखमी बिबट्याचे प्राण वाचावेत आणि अशा घटना पुन्हा घडू नये हीच प्रार्थना सर्वांच्या तोंडून निघत आहे.
