पत्रकार शहाजी दिघे व शंकर सोनवणे यांना महाराष्ट्र गौरव रत्न २०२५ पुरस्कार जाहीर
लोणी ज्ञानेश्वर साबळे महाराष्ट्रातील सामाजिक जागरूकता,ग्रामीण प्रश्नांवरील भेदक लिखाण आणि धारदार पत्रकारितेची ओळख निर्माण करणारे राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील सामाजिक पत्रकार शहाजी सुखदेव दिघे आणि राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील शंकर किसन सोनवणे यांना यंदाचा “महाराष्ट्र गौरव रत्न २०२५” हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.पुरस्काराच्या या घोषणेनंतर जिल्हाभरातील पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
७ डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात प्रथमच या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, ग्रामीण पत्रकारितेतील त्यांच्या प्रभावी कार्याचा अधिकृत गौरव या मंचावर केला जाणार आहे.
ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्नांना राज्याच्या पातळीवर नेणे,शासनाला उत्तरदायी धरणे, सामाजिक बदलासाठी निर्भिड भूमिका मांडणे या त्यांच्या कार्यामुळे दोघेही ग्रामीण पत्रकारितेतील प्रभावी चेहरे ठरले आहेत.
पत्रकारिता बरोबरच सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे.त्यांची स्पष्ट लेखनशैली,जनतेच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडण्याची धडाडी ही वाखाणण्याजोगी आहे आणि तिच त्यांची ओळख बनली आहे.
पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड, मराठी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन आर.एन.जी. सी.ग्रुप व विद्यराज फाऊंडेशन यांच्या वतीने होत असून नियोजन डॉ.सुरेश झाडे, सिनेअभिनेते सुनील पाटील व डॉ. निहाल राजू कांबळे यांनी केले आहे.
हा सन्मान म्हणजे केवळ दोन पत्रकारांचा गौरव नसून— ग्रामीण पत्रकारितेच्या सामर्थ्याची दखल आणि लोकशाही बळकट करणाऱ्या लेखणीचा सन्मान असल्याचे सर्वत्र व्यक्त होत आहे.
