लोणी सुयश वाघमारे सर्व धर्मग्रंथांहूनही सर्वश्रेष्ठ भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व समाज घटकांना एकत्र बांधून ठेवले आहे.सर्व प्रकारचे भेदभाव या संविधानाने मिटविले असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतात समता टिकून आहे. त्यामुळे उद्याच्या भारताचाही आधार डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान असल्याचे प्रतिपादन भंते सचित्त बोधी यांनी केले.
सम्यक साधना संघ लोणी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.दरम्यान भंते सचित्त बोधी यांची धम्मदेसना झाली. जनतेला प्रबोधित करताना सचित्त बोधी म्हणाले की मानवाने जीवनात शुद्ध आचरण करून बुद्धत्वाची प्राप्ती करावी.
निर्वाण हे जीवनातील सर्वात सुखद स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या जीवनात बाबासाहेबांचे विचार अंगीकारून व बाबासाहेबांच्या कष्टाची जाणीव ठेवून मार्गक्रमण करण्याचे सांगितले. सगळ्या समाजाला सोबत घेऊन मूल्यवर्धित समाज घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.तथापी आपल्या पंचक्रोशीत आदर्श बुद्ध विहार असावे व त्यासाठी सर्वांनी एकमताने पुढे येऊन लोणी पंचक्रोशीत बुद्ध विहाराचे निर्माण करण्याचे आवाहन केले.
यावेळी पं.स.सदस्य संतोष ब्राह्मणे,संतोष उबाळे,नरेंद्र पवार,प्रा.रवींद्र कदम,दिनकर साठे,डॉ.सुनील काळेबाग,शशिकांत साबळे,विजय तांबे, सुयश वाघमारे,सुमेध ब्राह्मणे व सम्यक साधना संघाचे सदस्य उपस्थित होते.
