नाशिक दिनकर गायकवाड महावितरणच्या भरारी पथकाने शहरातील भद्रकाली व सह्याद्री हॉस्पिटल जवळील एका ठिकाणी छापा टाकून वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणला असून, दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजचोरीचा पहिला प्रकार सह्याद्री हॉस्पिटलसमोरील देवांग संकुलामध्ये घडला.आरोपी मुजीब हबिब पठाण व सोहेल सलिम शेख (दोघेही रा. देवांग संकुल, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, नाशिक) यांचे क्वालिटी नमकिन नावाचे दुकान आहे. आरोपी वीज वापरकर्ते सोहेल शेख यांनी आरोपी वीजग्राहक मुजीब हबिब पठाण यांच्या नावे असलेल्या वीज मीटरमध्ये सिटीची वायर शॉर्ट करून मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची बाब पथकाने टाकलेल्या छाप्यात समोर आली.या प्रकरणी मुजीब पठाण व साहिल शेख यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजचोरीचा दुसरा प्रकार जुन्या नाशिकमध्ये घडला. आरोपी हाजी अल्लाउद्दीन कोकणी,वसिम हसन पठाण व क्रिष्णाचंद राजाराम अग्रवाल यांनी त्यांच्या नावे असलेल्या वीज मीटरच्या टर्मिनलला लूप वायर टाकून वीज मीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून वीजचोरी केल्याचे पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही वीजचोरीप्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार तिवारी यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
