नाशिक दिनकर गायकवाड पिकअप गाडी वापरण्यासाठी दिली नाही म्हणून आठ ते बारा जणांच्या टोळक्याने गाडीमालकाला चॉपरचा धाक दाखवून दहा लाखांचे बोलेरो पिकअप वाहन बळजबरीने पळवून नेल्याची घटना पेठ रोड येथे घडली.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे पेठ रोडवरील सप्तरंग सोसायटी परिसरात राहतात. दि. २७जानेवारी रोजी सायंकाळी ७वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचा असलेला आरोपी आदित्य ऊर्फ ताऱ्या रामदास पिंगळे व त्याच्यासोबत कुणाल
एखंडे, कुंदन परदेशी, राहुल गवारे, चिक्कू भुजबळ, कमलेश सुराणा, ओम् व मानसी नावाची महिला व त्यांचे इतर तीन साथीदार फिर्यादीच्या राहत्या घरी आले. आरोपी आदित्य पिंगळे याने फिर्यादीकडे पिकअप गाडी मागितली. ही गाडी देण्यास फिर्यादीने नकार दिला. त्याचा राग आल्याने आदित्य पिंगळे याने त्याच्या हातातील लोखंडी चॉपरचा धाक दाखवून फिर्यादीच्या पँटच्या खिशातून पिकअपची चावी काढून घेतली. त्यावेळी आरोपी कुणाल एखंडे, कुंदन परदेशी, राहुल गवारे, चिक्कू भुजबळ, कमलेश सुराणा व ओम् नावाच्या व्यक्तीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच त्यांच्या
शर्टाच्या खिशातून २ हजार ३५० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. या सर्व आरोपींकडे लाकडी दांडके व कुन्हाड असे साहित्य होते. यावेळी कुंदन परदेशी याने धमकी दिली, की तू जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला, तर तुझा गेम वाजवितो, असा दम दिला. त्यानंतर फिर्यादीच्या मालकीची एमएच १५ जेसी ००२ या क्रमांकाचे महिंद्रा पिकअप वाहन बळजबरीने हिसकावून मखमलाबाद गावाच्या दिशेने पळून गेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
