नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी अवघा आठवडा उरला असून,अजून एकाही प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जाहीर सभा न झाल्याने उमेदवारांना स्वतःच्या बळावरच प्रचारावर जोर द्यावा लागत आहे.दुसरीकडे मतदारांकडून सर्वच उमेदवारांना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत,असे भासविले जात असल्याने मतदारांच्या मनाचा ठाव लागत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष माघारीनंतर सुरूवात झाली असली तरी, बहुतांशी इच्छूकांनी तत्पूर्वीच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तयारी सुरू करून प्रभागात विविध कामांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात केली.
मात्र पक्ष कोणता याबाबत मौन बाळगण्यात आले. ज्यांनी पक्षाची उमेदवारीची खात्री धरली त्यांच्या नशिबी शेवटच्या क्षणाला अवहेलना आल्याने त्यांनी अपक्ष म्हणून तर काहींनी पक्षांतराची वाट धरली.आता मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरूवात झाल्याने उमेदवारांनी पक्ष चिन्हासह प्रचाराला सुरूवात केली असून, प्रत्येक प्रभागात सुमारे ४० ते ४५ हजार मतदार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली जात आहे.प्रचार रॅली,पदयात्रा, प्रचारपत्रके पोहोचवली जात आहे,त्याचबरोबर मतदारसंघात नाव आहे.
परंतु अन्यत्र राहायला गेलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांना आपल्याच मतदारसंघात येऊन मतदान करण्याविषयीचे आवाहन करण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची वर्गवारी करून घरोघर फिरणे याला अधिक महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभांची प्रतिक्षा असून नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार येत्या मंगळवारी (दि. १३) सायंकाळी संपुष्टात येणार आहे.
व मनसे यंदाही भाजप उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या सभेची उत्सुकता आहे. दुसरीकडे शिवसेना व मनसे एकत्र आल्याने दोन्ही पक्षांची सारी भिस्त ठाकरे बंधूंच्या संयुक्त जाहीर सभेवर आहे. राष्ट्रवादीत सभेविषयी साशंकता असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री छगन भुजबळ हे आजारी असल्याने प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच सारी
भिस्त असून, नाशिकमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी अजून तरी त्यांचा दौरा ठरलेला नाही. अशीच परिस्थिती शरद पवार गटाची आहे.शरद पवार यांची सभा होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असून, खा. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व राजकीय वातावरणात काँग्रेस पक्ष मात्र कोसोमैल दूर असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या निष्ठावंताना उमेदवारी मिळाली नसल्याने एक गट प्रचारापासून दूर गेला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही फारसे लक्ष घातलेले नाही.शिवाय पक्षाकडे विरोधकांची मते खेचून आणणारा स्टार प्रचारकही नसल्याने काँग्रेसचे मोजकेच उमेदवार आपल्याकडून उमेदवारी मिळालेली असली तरी वैयक्तिक भरोशावरच ती लढत आहेत.
