नाशिक दिनकर गायकवाड येथील गंगापूर रोड परिसरात जुन्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एकूण १२ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत धारदार हत्यारे, लोखंडी सळई,विटा व लाकडी दांडक्यांचा वापर झाल्याने काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी लखन मोहन रनशूर (वय ३८, रा. प्लॉट क्रमांक ४५, सौभाग्यनगर, पंपिंग रोड, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार, फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी एकत्र येत घरासमोर गोंधळ घातला.
ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादीसह सौरभ सावंत, राहुल खापरे, राजू मोरे, गणेश मोरे आणि संगिता सावंत यांना धमकावून शिवीगाळ करण्यात आली.त्यानंतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी तसेच विटा,लाकडी दांडके व फायटरने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी गुरुदत्त दामले याने संगिता सावंत यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळईने कपाळावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.तसेच गुड्ड्या देशमुख, विकास केसे, दीपक केसे, सुधाकर दामले, ओमकार दामले आणि गुरुदत्त दामले यांनी राहुल खापरे व राजू मोरे यांना घेरून धारदार हत्याराने हल्ला केला.
राहुल खापरे यांच्या पाठीवर व मांडीवर, तर राजू मोरे यांच्या कमरेवर वार करून दुखापत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात मयूर सोळसे, त्याचा भाऊ,गुड्ड्या देशमुख, विकास केसे,दीपक केसे, सुधाकर दामले, ओमकार दामले, गुरुदत्त दामले,अनिता दामले, विश्वास शेळके, विजय शेळके व विजय शेळके याची आई अशा एकूण १२ जणांचा समावेश आहे.या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
