चीन आणि पाकिस्तानच्या स्वस्त कांद्यामुळे लासलगावच्या कांदा निर्यातीवर परिणाम

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड अरब देशांमध्ये,चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने कांदा भावात कमालीची घसरण झाली असून, कांदा उत्पादक चिंतेत आहेत.
निफाड तालुक्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा दिवसात कांदा दरात १ हजार रुपयांची मोठी घसरण; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अंदाजे १७५ ते २०० कोटींचे नुकसान झाले आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात सुमारे ६०० रुपयांची, तर मागील १५ दिवसांत - तब्बल एक हजार रुपयांनी घसरण - झाली आहे.

त्याला कारण लासलगावसह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारतातन होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणातच सुरू आहे, तसेच अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

या सर्व परिस्थितीचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये झालेल्या २० लाख क्विंटल आवकेमागे अंदाजे १७५ ते २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे १५०५ वाहनांद्वारे २३ हजार ४२० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

या कांद्याला जास्तीत जास्त २२०० रुपये, कमीत कमी ७०० रुपये, तर सरासरी १६२५ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. कांद्याच्या बाजारभावात सतत घसरण होत असल्याने भविष्यात उन्हाळ कांद्याप्रमाणे या लाल कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे कठीण होणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधन व्यक्त केली जात

असून, राज्य व केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करून परदेशात जास्तीत जास्त कांद्याची निर्यात व्हावी, यासाठी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे, असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे नागरिकांना कांदा महाग झाल्यास कमी दरात किंवा वाजवी दारात मिळावा म्हणून केंद्र शासन कांदा स्थिरीकरण निधीवर करोडो रुपयांची तरतूद करते, तसेच तरतूद कांदा उत्पादकांचे भाव कमी झाल्यावर त्यांना कांदा अनुदान देण्यासाठी शासनाने दरवर्षी केली पाहिजे, असे मत कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी व्यक्त केले.

अरब देशांमध्ये चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी दीपक जाधव यांनी सांगितले.सध्याचा मिळणारा कांदा बाजारभाव हा वाहतूक खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झालेले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!