नाशिक दिनकर गायकवाड गेल्या पाच महिन्यांपासून नाशिक मधील एका लॉजवर राहून विविध परिसरांतून १७ सायकली चोरणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे या आरोपीवर बुलढाणा,अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सायकली चोरल्याचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत माहिती अशी, की पाथर्डी फाटा येथील टोयोटा शोरूमजवळ एक इसम चोरीची इलेक्ट्रिक सायकल विक्री
करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.समाधान हिरे व हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, हवालदार मधुकर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, अंमलदार प्रवीण
वानखेडे, तेजस मते, जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने टोयोटा शोरूमजवळ सापळा रचला असता खबरीप्रमाणे एक इसम सायकल घेऊन आला.त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अर्जुन बेलप्पा वाणी (वय ४४, रा. हिंदूधर्मशाळा, जि. अकोला, सध्या रा. आदर्शनगर, सराफ बाजार, नाशिक) असे असून, त्याने सुमारे पाच महिन्यांत नाशिकच्या विविध
परिसरांतून १७ सायकली चोरल्या आहेत, अशी कबुली दिली. यापैकी एका सायकलचोरीची नोंद अंबड पोलीस ठाण्यात आहे. या सायकलीची किंमत दीड लाख रुपये आहे.अधिक चौकशीत त्याने नाशिकसह बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी जिल्ह्यांमधून सायकली चोरल्याचे कबूल केले आहे.
आरोपीस मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
