महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्टया सक्षम व आत्मनिर्भर व्हावे

Cityline Media
0
निर्भय कन्या अभियान कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी सौ.धनश्री विखे पाटील यांचे प्रतिपादन 

कोल्हार प्रतिनिधी महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होणे हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे.यासाठी सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध प्रशिक्षणे दिली जातात,ज्यामुळे महिलांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते.महिलांनी या संधींचा लाभ घेऊन प्रशिक्षण घ्यावे आणि यशस्वी उद्योजिका बनून आत्मनिर्भर व्हावे," असे आवाहन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे यांनी केले.
कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या' 'कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत नुकतेच महिला सबलीकरण व सक्षमीकरण कक्षाच्या वतीने आयोजित 'निर्भय कन्या अभियान कार्यशाळे'चे उद्घाटन सौ. धनश्री विखे यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अलका संभाजीराजे देवकर या होत्या.आपल्या प्रमुख भाषणात विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन करताना सौ. धनश्री विखे यांनी सांगितले की," आजच्या युवतींसाठी आकाश हे खुले असते.या वयात चांगली स्वप्ने बघावीत आणि चांगले करिअर घडवावे. स्पर्धेच्या युगात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर विद्यार्थिनींनी शिक्षणाची व नोकरीची जिद्द न सोडता विविध क्षेत्रात किमान दोन वर्ष तरी नोकरीचा किंवा व्यवसायाचा अनुभव घेतला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.

ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. पहिल्या सत्रात सौ. गायत्री राजेंद्र मस्के (प्रवरा केव्हीके रेडिओ केंद्र, बाभळेश्वर) यांनी तर दुसऱ्या सत्रात कु.दिशा देशमाने (कराटे प्रशिक्षक, तायक्वांदो ब्लॅक बेल्ट, नॅशनल मेडलिस्ट) यांनी उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी कार्यशाळा घेण्याविषयीची भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रतिभा कानवडे यांनी केले. आभार महिला सबलीकरण व सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक डॉ. मनीषा पवने यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. सौ. संगीता धिमते यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!