सौ. शालिनीताई विखे यांचे चणेगावात हळदी-कुंकू समारंभ महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन
हनुमंतगाव संदीप गावडे बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिक बचतच करू नये, तर नियमितता, पारदर्शक व्यवहार आणि शाश्वत उद्योगांची निवड करून स्वतःची नवी ओळख निर्माण करावी. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्रीकडे वाटचाल केल्यास महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे महिला बचत गटांच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महिलांचे संघटन आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला चणेगाव परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळी सौ.शालिनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, "बचत गट ही महिलांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. महिलांनी आता केवळ घरगुती कामात न रमता नवनवीन उद्योगांचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेत आपले योगदान द्यावे." यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहितीही दिली.
या कार्यक्रमादरम्यान विविध बचत गटांच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी मांडल्या, ज्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
या सोहळ्याप्रसंगी प्रवरा साखर कारखान्याच्या संचालिका हिराबाई पाटोळे, प्रवरा बँकेचे माजी संचालक बाजीराव खेमनर, कारखान्याचे माजी संचालक सोपानराव गुळवे, बाबासाहेब लोहाळे, हौशाबापू पाटोळे, प्रा. भास्कर पाटोळे, बाबासाहेब पाटोळे, बाबासाहेब खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर, रंगनाथ सिनारे, इंद्रभान ढमक, सुभाष पाटोळे, दीपक घोगरे, प्राध्यापक श्री.शेरमाळे पत्रकार शरद ढमक, शरद पाटोळे, दीपक सोनवणे, गणेश खेमनर, प्रवीण शेपाळ, पत्रकार सोमनाथ डोळे, विशाल घोलप उपस्थित होते.
प्रसंगी महिला आघाडीच्या सोनुबाई खेमनर, मनीषा ढमक, नीता ढमक, संगीता शेलार, रेखा पठारे, मंदा पाटोळे, सुनीता ढमक, शोभाताई गुळवे, सौ. लता पाटोळे, नंदा पाटोळे, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या सौ. सज्जला लांडगे मॅडम, सौ. मीना पाटोळे, सौ. बेबी पाटोळे, सौ. संगीता पाटोळे, सौ. रंजना पाटोळे यांच्यासह चणेगावमधील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ. लताबाई पाटोळे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर उपस्थितांचे आभार हिराबाई पाटोळे यांनी मानले. हळदी-कुंकू आणि वाण वाटपाने कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.
