अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे माजी रजिस्ट्रार संपत बोरकर काळाच्या पडद्याआड

Cityline Media
0
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी संपतराव बोरकर ‘आप्पा’ यांचे निधन 

संगमनेर (प्रतिनिधी)अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मा. रजिस्ट्रार, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी दिवंगत संपतराव रामकृष्ण बोरकर यांचे  नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अमृतवाहिनी संस्थेसह संपूर्ण सहकार व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिवंगत संपत बोरकर हे अत्यंत करारी,शिस्तप्रिय आणि कामावर अपार निष्ठा ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेची पायाभरणी होत असताना संस्थेची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या सक्षम हातात घेतली. संस्थेच्या उभारणीच्या काळात प्रशासन,शैक्षणिक नियोजन, शिक्षक भरती, विद्यापीठाशी समन्वय, तसेच दैनंदिन कामकाजाची शिस्तबद्ध रचना उभी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

१९८३ च्या सुमारास अमृतवाहिनी संस्थेचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालले पाहिजे, गुणवत्ताधारित शिक्षक भरती कशी केली पाहिजे, विद्यापीठाशी संवाद आणि नियमपालन कसे असावे,याची सर्व जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या दिवंगत संपत बोरकर यांनी महाविद्यालयीन इमारतींच्या बांधकामातही जातीने लक्ष घातले. ८० च्या दशकात बाहेरील राज्यांमधून होणारी प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांशी थेट संवाद, कडक शिस्त आणि स्पष्ट निर्णयक्षमता यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये त्यांची ‘आप्पा’ या नावाने ओळख निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत ते नेहमीच आग्रही असत. त्यांच्या शब्दाला संस्थेमध्ये, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप किंमत होती. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या निधनानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिवंगत संपत बोरकर यांच्यावर अतिशय विश्वासाने अमृतवाहिनी संस्थेच्या कामकाजाची मोठी धुरा सोपवली होती.

मूळचे जोर्वे येथील असलेल्या  संपत बोरकर यांना त्यांच्या पत्नी भिमाबाई बोरकर यांनी आयुष्यभर मोलाची साथ दिली. त्यांनी घराची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत पतीच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याला भक्कम आधार दिला दिवंगत.संपत बोरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. भारत बोरकर हे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दुसरे चिरंजीव दौलत बोरकर हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

कुटुंबप्रमुख म्हणूनही दिवंगत संपत बोरकर अतिशय आपुलकीने सर्व नातेसंबंध जपत असत.भाऊ शशिकांत बोरकर,बादशाह बोरकर, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. भास्कर बोरकर तसेच सौ.शिला करंजेकर यांनी बोरकर कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. दिवाळी व इतर सण-उत्सवांच्या निमित्ताने संपूर्ण बोरकर कुटुंब जोर्वे येथे एकत्र येत असे, ही त्यांची खास ओळख होती.दिवंगत संपत बोरकर यांच्या पश्चात तीन भाऊ,एक बहिण, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!