आश्वी खुर्द संजय गायकवाड दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ग्रामशाखा महिला शाखेचे ऐतिहासिक उद्घाटन नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रियंका मुन्तोडे यांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.प्रसंगी संगमनेर तालुका पदाधिकारी शैला भालेराव यांच्या उपस्थितीत आणि पंचक्रोशीतील धम्म उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत हा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.
डॉ. प्रियंका मुन्तोडे यांनी आपल्या मनोगतात पुढे बोलताना प्रथम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून सर्वांना 'नमो बुद्धाय! जय भीम!' अशा शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, आजचा दिवस आश्वी गावाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.या नव्या महिला शाखेच्या माध्यमातून गावात नवी पहाट आणि नवतेजाचा प्रकाश पसरेल यात तीळमात्र शंका नाही.
परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ मे १९५५ रोजी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे उद्दिष्ट स्मरण करून डॉ. मुन्तोडे म्हणाल्या, “अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या दलदलीत खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाचा सूर्य दाखवणारा, माणसाला माणूस म्हणून वागवणारा आणि अस्पृश्यतेची काळिमा पुसणारे संविधान बाबासाहेबांनी दिले. बुद्धांची शिकवण घराघरात पोहोचावी आणि मानव कल्याणाचा मार्ग सर्वांना दिसावा यासाठी त्यांनी लावलेला हा वटवृक्ष आज या ग्रामशाखेच्या रूपाने आश्वी खुर्दमध्ये निर्माण होत आहे.”
ही महिला शाखा केवळ बौद्ध उपासनेचे केंद्र नसून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र बनेल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. घराघरात भगवान बुद्धांची करुणा, प्रज्ञा आणि शांतीची शिकवण पोहोचवण्याचे काम ही शाखा करेल.बाबासाहेबांच्या प्रसिद्ध उदगाराचा उल्लेख करताना डॉ. मुन्तोडे म्हणाल्या, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल.” भारताला परकीयांनी गुलाम बनवले, परंतु आजही जातीयवाद आणि गुलामीच्या बेड्या आपल्याला जखडून ठेवत आहेत. त्यांनी सांगितले की, “पायातली बेडी तुटत नसेल, तर आपला पाय कापा. लंगडत चला पण स्वातंत्र्याने चला.” बाबासाहेबांनी बेड्या तोडण्याचे काम केले, आता त्या आपल्यालाच तोडाव्या लागतील.
ते पुढे म्हणाल्या, “संघटित रहा आणि संघर्ष करा” हे बाबासाहेबांचे सूत्र आज तीनही पातळीवर शिक्षण, संघटन, संघर्ष अमलात आणणे गरजेचे आहे. राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता संकुचित होत असताना समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, संघटित होणे आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही.
“तुफानातील दिवे आम्हालाच पेटवावे लागतील या वाऱ्याने मावळणारी जात आमची नाही” असे सांगून त्यांनी विवेक बुद्धीच्या दिव्यात सद्धम्माची वात ओतून बौद्ध धम्माचा दिवा अखंड तेवत राहावा यासाठी सर्वजण एकत्र येऊन लढण्याचे आणि जिंकण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम गावातील बौद्ध समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, महिला शाखेच्या माध्यमातून सामाजिक जागृती आणि धम्म प्रबोधनाचे नवे पर्व सुरू झाले आहे.यावेळी शैला भालेराव यांनी फलक अनावरण केले व जिल्हा संरक्षण विभाग उपाध्यक्ष शकुंतला जाधव यांनी धम्म ध्वजारोहण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैला भालेराव या होत्या. कार्यक्रमात संगिता मुन्तोडे, मनिषा भालेराव, वंदना कदम, आशा खरात, पुजा मुन्तोडे, सुरेखा मुन्तोडे,शिला मुन्तोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
