नाशिक दिनकर गायकवाड एका महिलेस चाकूने मारून तिचे दागिने काढून घेतले आहेत, असे सांगून तोतया पोलिसांनी वृद्धेकडील १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करून फसवणूक केल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली.
फिर्यादी प्रफुल्ला रोहित कामदार (वय ६६, रा. सायन पश्चिम, मुंबई) हे नुकतेच साडेआठ वाजेच्या सुमारास मैत्रीण रश्मी शहा असे जालावाडी सॅनिटोरियम येथून अजमेरा हॉटेलकडून लॅम रोडकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी एका सोसायटीसमोर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला थांबवून आपण पोलीस असल्याची बतावणी केली. "या ठिकाणी एका महिलेला चाकू मारून तिचे दागिने काढून घेतले आहेत," असे सांगून फिर्यादीस दागिने काढण्यास सांगितले; मात्र फिर्यादीने दागिने काढण्यास नकार दिला असता
फिर्यादीची खात्री व्हावी म्हणून तोतया पोलिसांचा चौथा साथीदार याने त्याच्या गळ्यातील चेन काढून देऊन फिर्यादीला खात्री पटवून दिली. त्यावर विश्वास ठेवण्यास सांगून फिर्यादीला स्वतःच्या अंगावरील दागिने काढून देण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादीने २ लाख ८०
हजार रुपये किमतीच्या ७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या डायमंड खडे असलेल्या दोन बांगड्या असे एकूण ५ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने काढून तोतया पोलिसांकडे दिले. त्या अनोळखी इसमांनी फिर्यादीची दिशाभूल करून या बांगड्या रंगाच्या कागदात गुंडाळून पुडी करून ती पुडी रश्मी शहा यांच्या पर्समध्ये ठेवण्याचे भासविले;
परंतु तोतया पोलिसांनी संगनमत करून या बांगड्या स्वतःकडेच ठेवून घेऊन वृद्धेची फसवणूक करीत मोटारसायकलीने पळून गेला.या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गुंजाळ करीत आहेत.
